आईच्या शिवणकामावर तिने जिंकला सीईटीचा गड..!

By Admin | Updated: June 7, 2014 00:22 IST2014-06-07T00:05:30+5:302014-06-07T00:22:50+5:30

हणमंत गायकवाड, लातूर पती हयात असताना काही कारणामुळे विभक्त व्हावे लागलेल्या एका आईने आयुष्याचा प्रवास शिवताना धाग्याला धागा जोडून

She won the citadel of Mother CET ..! | आईच्या शिवणकामावर तिने जिंकला सीईटीचा गड..!

आईच्या शिवणकामावर तिने जिंकला सीईटीचा गड..!

हणमंत गायकवाड, लातूर
पती हयात असताना काही कारणामुळे विभक्त व्हावे लागलेल्या एका आईने आयुष्याचा प्रवास शिवताना धाग्याला धागा जोडून शिवणकाम व बालवाडीच्या मुलांच्या शिकवणी घेत तुटपुंज्या कमाईवर मुलीला मोठ्या जिद्दीने डॉक्टर करण्याचा पण केला. आईच्या विश्वासाला सार्थ ठरवीत अनघा दाताळने सीईटीचा गड जिंकला. तिने ५३५ गुण घेऊन वैद्यकीय प्रवेशाचा आपला मार्ग पक्का केला आहे.
लातूर शहरातील कृपासदन परिसरात वास्तव्यास असलेल्या रेखा दाताळ यांना डॉक्टर असलेल्या पतीकडून काही कारणांमुळे विभक्त व्हावे लागले. सोबत दोन मुलींना घेऊन रेखा दाताळ विभक्त झाल्या आणि त्यांनी त्यावेळेसच पण केला, नवऱ्यासारखेच मुलीला डॉक्टर करण्याचा. कृपासदन इंग्रजी शाळेत मोठी मुलगी अनघा हिला अ‍ॅडमिशन मिळवून दिले. मुलीनेही तितकीच चुणूक दाखविली. कृपासदन शाळेतून तिने १० वीच्या परीक्षेत ९४ तर दयानंद विज्ञान महाविद्यालयातून १२ वीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण संपादन केले. आईचे स्वप्न साकार करण्यासाठी अनघाने अभ्यास सुरू केला. महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेत नोकरीस असलेल्या मामानेही भाचीला हातभार लावला. पुस्तके, ट्युशन, शाळा-महाविद्यालयातील खर्चाची बरीच जबाबदारी मामा दत्तात्रय पाटील यांनी घेतली अन् अनघाने सीईटीचा अभ्यास सुरू केला. दररोज ५ ते ७ तास नियमित अभ्यास केला अन् अनघाला ५३५ मार्क मिळाले. वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचा आनंद माय-लेकीच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहत होता.अनघाची आई रेखा दाताळ या गेल्या दहा वर्षांपासून शिवणकाम आणि बालवाडीतील मुलांचे ट्युशन घेऊन उदरनिर्वाह करतात. दररोजच्या प्रपंचातून काही पुंजी जमा करून दोन मुलींच्या शिक्षणावर त्या खर्च करतात. अनघा आता वैद्यकीय प्रवेश घेईल. छोटी सातवीला कृपासदनमध्येच आहे. भाऊ दत्तात्रय पाटील यांची साथ सावलीसारखी आहे. त्यामुळे माझी मुलगी डॉक्टर होतेय, अशी कृतज्ञता अनघाच्या आईने व्यक्त केली.
स्त्री रोगतज्ज्ञ व्हायचंय्...
वडील डॉक्टर असले तरी त्यांचे प्रेम मिळाले नाही. आईने काबाड कष्ट करून मला शिकविले आहे. मामानेही तेवढेच प्रेम केले आहे. मामामुळेच आज मी सीईटीची परीक्षा देऊन वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशास पात्र झाले आहे. एमबीबीएस होऊन एमएस करण्याचा मानस आहे. नामांकित स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून समाजाची सेवा करण्यासाठी पुढील परिश्रम घेण्यास मी तयार झाले आहे, असेही अनघा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाली.

Web Title: She won the citadel of Mother CET ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.