‘ती’ चार अल्पवयीन मुले कुटुंबियांकडे सुखरुप परतली
By Admin | Updated: June 13, 2017 23:39 IST2017-06-13T23:37:34+5:302017-06-13T23:39:31+5:30
परभणी : शहरातील साखला प्लॉट भागातून रविवारी सकाळी गायब झालेली चार मुले रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पुन्हा कुटुंबियांकडे सुखरुप परतली आहेत.

‘ती’ चार अल्पवयीन मुले कुटुंबियांकडे सुखरुप परतली
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील साखला प्लॉट भागातून रविवारी सकाळी गायब झालेली चार मुले रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सायंकाळी पुन्हा कुटुंबियांकडे सुखरुप परतली आहेत. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
येथील परळी रेल्वे गेट भागातील साखला प्लॉट येथे वास्तव्यास असलेली चार मुले घरातून गायब झाली होती. त्यामुळे दिवसभर अन्सारी आणि रहेमान हे कुटुंबीय मुलांचा शोध घेत होते. मुले सापडत नसल्याने कुटुंबीय सकाळपासूनच चिंतेत पडले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर चार मुले भटकत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आले. रेल्वे पोलिसांनी या मुलांना बोलावून त्यांचे नाव व संपूर्ण पत्ता विचारला. त्यातील एका मुलीने सांगितलेल्या भ्रमणध्वनीवरुन मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या पालकांना रेल्वेस्थानकावर बोलावून घेतले तेव्हा ती त्यांचीच मुले असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एजान अन्सारी (वय दीड), नजिया (१०), तब्बू (९) आणि सानिया (८) या चारही मुलांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले. ही कामगिरी रेल्वे पोलीस हवालदार शफीयोद्दीन शेख, राम कातकडे, गजानन धायडे, महिला पोलीस कर्मचारी पूजा आगाशे, अन्सावली शेफीयार यांनी केली.
दरम्यान, रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालकांना त्यांची हरवलेली मुले परत मिळाली असून, रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.