शिराढोण शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली
By Admin | Updated: August 5, 2016 00:12 IST2016-08-05T00:08:34+5:302016-08-05T00:12:41+5:30
शिराढोण : कळंब तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पीकविमा वाटपाचे नियोजन ढासळल्याने दीड महिन्याचा कालावधीत उलटूनही काही शेतकऱ्यांना अद्यापही विमा रकमा मिळालेल्या नाहीत.

शिराढोण शाखा व्यवस्थापकाची तडकाफडकी बदली
शिराढोण : कळंब तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पीकविमा वाटपाचे नियोजन ढासळल्याने दीड महिन्याचा कालावधीत उलटूनही काही शेतकऱ्यांना अद्यापही विमा रकमा मिळालेल्या नाहीत. लोकमतचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रशासनाने शिराढोण शाखेचे व्यवस्थापक के.के. कोल्हे यांची बदली करून तेथे रमेश काळे यांची नियुक्ती केली आहे.
जिल्हा बँकेच्या शिराढोण येथील शाखांतर्गत १७ गावांतील शेतकऱ्यांचा व्यवहार चालतो. गतवर्षी खरीप हंगामातील पीकविम्यापोटी ८ हजार ३०० शेतकऱ्यांसाठी ११ कोटीहून अधिक रक्कम मंजूर झाली होती. जूनपासून पीकविम्याचे वाटप सुरू करण्यात आले असले तरी अजून एक कोटीचे वाटप करणे बाकी आहे. ही शाखा संगणकीकृत झाली असली तरी संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना दोन-दोन वेळा स्लीप भरून द्यावी लागत आहे. पीकविमा रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी गर्दी होत आहे. स्लीप भरून देवून १५ दिवसांचा कालावधी लोटला तरी पैसे मिळत नाहीत. अनेक शतकऱ्यांना भरून दिलेल्या स्लिपही सापडत नाहीत.
इंटरनेट बंद, कॅश नाही, खात्यावर पैसा जमा करण्याचे काम चालू आहे, उद्या बघू अशी एक ना अनेक उत्तरे ऐकून शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. तरी जिल्हा बँकेच्या वरिष्ठांनी या प्रश्नाकडे लक्ष देवून उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांना त्वरित विमा रक्कम जमा करावी, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. आजही दिवसभर बँकेत सावळागोंधळा सुरूच हता.
नवीन शाखा व्यवस्थापकाने विमा वाटपाचे काम तत्काळ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासनाने शिराढोण शाखेतील खास बाब म्हणून येथील शाखा व्यवस्थापक के.के. कोल्हे यांची बदली करून नवीन शाखा व्यवस्थापक रमेश काळे यांचे नियुक्तीचे आदेश काढले आहेत. पुढील दोन दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यात येईल, असे प्रशासनाचे मुख्याधिकारी व्ही.जी. चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)