‘लोकमतच्या पुरवण्यांमधून ग्रंथ परिचयाला शंकर सारडा यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:14+5:302021-02-05T04:17:14+5:30

औरंगाबाद : ‘लोकमत’च्या पुरवण्यांमधून ग्रंथ परिचयाला शंकर सारडा यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे हे कार्य न विसरता येण्यासारखे आहे, ...

‘Shankar Sarda gave prestige to the introduction of books through the supply of Lokmat’ | ‘लोकमतच्या पुरवण्यांमधून ग्रंथ परिचयाला शंकर सारडा यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली’

‘लोकमतच्या पुरवण्यांमधून ग्रंथ परिचयाला शंकर सारडा यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली’

औरंगाबाद : ‘लोकमत’च्या पुरवण्यांमधून ग्रंथ परिचयाला शंकर सारडा यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांचे हे कार्य न विसरता येण्यासारखे आहे, अशा शब्दांत औरंगाबादच्या साहित्यिकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

अनेक नवे लेखक लिहिते केले..

वर्तमानपत्राच्या पुरवणीमधून शंकर सारडा यांनी अनेक नवे लेखक लिहिते केले. नव्या लेखणीचे कौतुक करताना प्रस्थापित लेखणीला खडे बोल सुनावले. नवनव्या कल्पना राबवल्या. सारडा यांनी वाचनसंस्कृती समृद्ध केली. साहित्याचे व्यासंगी अभ्यासक म्हणून ख्यातकीर्त असलेले शंकर सारडा यांनी ग्रंथपरीक्षणामध्ये स्वत:ची नाममुद्रा उमटवली. ग्रंथप्रसारासाठी त्यांनी स्वतःची लेखणी निष्ठेने चालवली.

-प्रा. डॉ. दासू वैद्य

मराठी विभागप्रमुख

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मानवी दर्शन घडविणारा महत्त्वाचा कवी हरपला...

शंकर सारडा हे मराठीतील मानवी दर्शन घडवणारे महत्त्वाचे कवी होते. मानवी जीवनाच्या सुखदुःखाच्या नातेसंबंधातील गुंत्यांचा सुरेख गोफ त्यांच्या लेखनात पहायला मिळतो. शंकर सारडा हे जसे सिद्धहस्त लेखक होते, तसे ते द्रष्टे संपादकही होते. ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीत त्यांनी केलेला प्रपंच आणि संपादक म्हणून पुरवणीसाठी आलेल्या लेखनावर त्यांनी केलेले संस्कार हे अविस्मरणीयच आहे.

प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे

मराठी विभागप्रमुख

स.भु. महाविद्यालय

पुस्तकप्रेमी व्यक्ती काळाच्या पडद्याआड...

शंकर सारडा हे लेखक-वाचक तर होतेच; पण ते कमालीचे पुस्तकप्रेमी होते. नवोदित लेखकांचे ते चाहते होते. प्रकाशकांनाही त्यांचे सहकार्य मिळत असे.

-कुंडलिक अतकरे

प्रकाशक

ग्रंथपरिचयाला प्रतिष्ठा मिळवून दिली..

शंकर सारडा यांचं बालसाहित्यातलं व अनुवादातलं योगदान मोठं होतंच. परंतु एकेकाळी ग्रंथ परिचय या प्राथमिक व दुय्यम अवस्थेतील प्रकाराला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. विशेषत: हे काम त्यांनी ‘लोकमत’च्या पुरवण्यांमधून केले.

- प्रा.डॉ. कैलाश अंभुरे

मराठी विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Web Title: ‘Shankar Sarda gave prestige to the introduction of books through the supply of Lokmat’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.