...त्या रात्री मम्मीच्या हातात होता सुरा !, सहावर्षीय चिमुकलीचा पोलिसांनी नोंदविला जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 05:30 PM2019-09-24T17:30:17+5:302019-09-24T17:32:14+5:30

शैलेंद्र राजपूत खून प्रकरण

Shalendra rajput murder case : The knife was in Mummy's hand that night! | ...त्या रात्री मम्मीच्या हातात होता सुरा !, सहावर्षीय चिमुकलीचा पोलिसांनी नोंदविला जबाब

...त्या रात्री मम्मीच्या हातात होता सुरा !, सहावर्षीय चिमुकलीचा पोलिसांनी नोंदविला जबाब

googlenewsNext
ठळक मुद्दे६ वर्षीय मुलीचा जबाब पोलिसांनी नोंदवला १६ वर्षीय दुसऱ्या मुलीने मात्र मम्मी-पप्पात केवळ भांडण झाल्याचे सांगितले

औरंगाबाद : मम्मी-पप्पाचे भांडण झाले तेव्हा मम्मीच्या हातात सुरा होता, असा महत्त्वपूर्ण जबाब  उद्योजक शैलेंद्र राजपूत खून प्रकरणात त्यांच्या सहावर्षीय मुलीने दिला आहे. त्यांच्या १६ वर्षीय दुसऱ्या मुलीने मात्र मम्मी-पप्पात केवळ भांडण झाल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले. दरम्यान, शैलेंद्र राजपूत यांचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी पूजा राजपूत आणि तिच्या मैत्रिणीची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.

याविषयी उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, उल्कानगरीतील खिंवसरा पार्कमधील मे-फेअर या उच्चभ्रू वसाहतीत शैलेंद्र राजपूत यांचा राहत्या घरात खून झाला होता. या खूनप्रकरणी शैलेंद्र यांची पत्नी संशयित आरोपी पूजा राजपूत पोलीस कोठडीत आहे. तपास अधिकाऱ्यांनी या घटनेशी संबंधित लोकांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. पूजाने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने हा खून केला नसल्याचे स्पष्ट करीत शैलेंद्रने स्वत:ला मारून घेतल्याचे म्हटले आहे, तर शवविच्छेदन अहवालामध्ये शैलेंद्रला अन्य व्यक्तीने मारल्याने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. यामुळे पूजा स्वत:ला वाचविण्यासाठी असे बोलत असल्याचे तपास अधिकाऱ्यांना वाटते. 

घटनेच्या रात्री शैलेंद्र, पूजा आणि त्यांच्या मुली घरात होत्या. राजपूत दाम्पत्याची मोठी मुलगी १६ वर्षांची, तर लहानी सहा वर्षांची आहे. घटनेनंतर दोन्ही मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसल्याने कालपर्यंत त्या जबाब देण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. सोमवारी तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही मुलींचे जबाब नोंदविले. यावेळी सहा वर्षांच्या सान्वीने मम्मी-पप्पाचे भांडण झाले. भांडणाच्या आवाजाने ती तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा मम्मीच्या हातात सुरा होता, असे पोलिसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली, तर मोठ्या मुलीने मम्मी-पप्पाचे भांडण झाल्याचे सांगितले. मात्र, कोणी कोणाला मारले हे, तिला माहिती नाही, असा जबाब तिने पोलिसांना दिला. या दोन्ही मुलींचे जबाब या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि खुनाच्या खटल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 

घटनास्थळी प्रथम पोहोचलेल्या पूजाच्या मैत्रिणीची चौकशी
पूजा हिची किट्टी पार्टीची एक मैत्रीण सायरा ही नंदनवन कॉलनीत राहते. तिचा पती अमेरिकेत संगणक अभियंता आहे. पती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर पूजाने घरापासून पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर राहणाऱ्या दिराला फोन न करता  पहिला मोबाईल कॉल सायराला केला. पूजाचा कॉल येताच सायरा लगेच खिंवसरा पार्कमध्ये गेली होती. पोलिसांनी सायराची कसून चौकशी केली.

पूजा राजपूतच्या पोलीस कोठडीत वाढ
शैलेंद्र राजपूत यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेली त्यांची पत्नी पूजा शैलेंद्र राजपूत हिच्या पोलीस कोठडीमध्ये २६ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे यांनी सोमवारी (दि. २३ सप्टेंबर) दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एल. एल. दास-जोशी यांनी, तर फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मच्छिंद्र दळवी काम पाहत आहेत.

साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न?
फिर्यादी पक्षाच्या वतीने सोमवारी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जात साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असून, आरोपी पूजाचे नातेवाईक यामागे असल्याचा आरोप करण्यात आला.दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपी पूजाला कोणीही भेटू शकणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Shalendra rajput murder case : The knife was in Mummy's hand that night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.