शांती मार्चने दणाणले शहर
By Admin | Updated: December 22, 2015 00:13 IST2015-12-21T23:57:46+5:302015-12-22T00:13:00+5:30
औरंगाबाद : महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली धम्मभूमी आणि शहरातील ९५ विहारे

शांती मार्चने दणाणले शहर
औरंगाबाद : महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेली धम्मभूमी आणि शहरातील ९५ विहारे अतिक्रमण समजून ती पाडण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी आज सोमवारी तमाम आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या मार्गाने निघालेल्या जवळपास ४० ते ५० हजार नागरिकांच्या शांती मार्चने संपूर्ण शहर दणाणून गेले. जालना रोडसह शहरातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील बुद्धविहारे बचाव, असा नारा देत दलित अत्याचार विरोधी सर्वपक्षीय कृती समिती व भिक्खू संघ यांच्या विद्यमाने सोमवारी शांती मार्चचे आयोजन केले होते. यासंदर्भात कृती समितीच्या सदस्यांनी मागील काही दिवसांपासून दलित वस्त्या, बुद्धविहारांमध्ये बैठका घेऊन या शांती मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला संपूर्ण शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ट्रक, मिनी बस, जीप, टेम्पो, कार अशा मिळेल त्या वाहनातून आंबेडकर अनुयायांचे जथेच्या जथे क्रांतीचौकात येत होते. त्यामुळे क्रांतीचौकापासून सोमवारी सकाळी ११.३० वाजता निघणारा हा शांती मार्च अखेर दुपारी १ वाजता सुरू झाला. भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर, भदन्त डॉ. एम. सत्यपाल, भदन्त नागसेन व भिक्खू संघाने बुद्धवंदना पठण केल्यानंतर नियोजित शांती मार्च पुढे निघाला. जसजसा हा शांती मार्च पुढे जात होता तसतसे नागरिकांचे जथे सहभागी होत गेले.