प्रवासात पळविले महिलेचे सतरा तोळ्यांचे दागिने
By Admin | Updated: November 4, 2014 01:39 IST2014-11-04T01:06:09+5:302014-11-04T01:39:18+5:30
औरंगाबाद : आजारी मुलाच्या उपचारास पैसे लागत असल्याने गहाण ठेवण्यासाठी आणलेले एका महिलेचे सतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले.

प्रवासात पळविले महिलेचे सतरा तोळ्यांचे दागिने
औरंगाबाद : आजारी मुलाच्या उपचारास पैसे लागत असल्याने गहाण ठेवण्यासाठी आणलेले एका महिलेचे सतरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. ही घटना औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये घडली.
घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, ठाणे येथील रहिवासी असलेल्या मेघा रमेश निंभोरकर यांचा लहान मुलगा आजारी आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे आपले सोन्याचे दागिने माहेरी कुणाकडे तरी गहाण ठेवावेत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशात मुलावर उपचार करावेत, असा विचार निंभोरकर यांनी केला. त्यांचे माहेर अमरावतीला आहे. त्या स्वत:चे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन मुलासोबत अमरावतीला गेल्या. मात्र, व्यवहार जुळला नाही. त्यामुळे दागिने परत घेऊन त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. बसने शनिवारी दुपारी त्या अमरावतीहून औरंगाबादला आल्या. काही वेळ येथील मध्यवर्ती बसस्थानकावर थांबल्यानंतर नाशिकमार्गे जाण्यासाठी त्या बसमध्ये बसल्या. काही वेळानंतर त्यांनी पर्समध्ये ठेवलेले दागिने सुरक्षित आहेत की नाही, हे पाहिले असता पर्समधील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीत संधी साधून आपले सतरा तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचे लक्षात आल्यानंतर नाशिकहून त्या परत औरंगाबादला आल्या आणि क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून त्यांनी दागिने चोरीची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी सांगितले.