सात आठवड्यांनंतर मराठवाडा चिंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 19:30 IST2017-08-20T17:34:46+5:302017-08-20T19:30:40+5:30
विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.

सात आठवड्यांनंतर मराठवाडा चिंब!
औरंगाबाद, दि. 20 : ५२ दिवसाचा दीर्घ खंड, दुबार पेरणीचे संकट, जलसाठ्यांमधील घटते प्रमाण अशा परिस्थितीत मराठवाड्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावट घोंघावत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगल्या पाऊस पडल्यानंतर वरुणराजाने ओढ दिली. श्रावण कोरडा गेल्यानंतर हवामान खात्याने जेव्हा १९ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा दिला तेव्हा सर्वांचे डोळे शनिवारी आकाशाकडे लागले होते. पावसानेही निराश न करता शनिवारी पहाटेपासुनच रिपरिप सुरू केली.
नांदेड जिल्ह्यात सर्वत्रच चांगला पाऊस झाला असून मुदखेडमध्ये बारड गावात सर्वाधिक २०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. नांदेड शहरातही १७८ मि.मी. पाऊस पडला. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली झाली असून सध्या प्रकल्पात ४८ द.ल.घ.मी. पाणी आहे. तसेच जायकवाडी धरणात गेल्या २४ तासांमध्ये २२.६० द.ल.घ.मी. आवाक झाली असून सध्या धरणात ३८.५३ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर जलसाठ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकºयांमध्ये आनंददायी वातावरण आहे.
गावांचा संपर्क तुटला
परभणी जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर आल्याने सकाळी १० वाजेपर्यंत पाच गावांचा तर धामोडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क तुटला होता. मुदखेडचा नांदेडसह इतर तालुक्यांशी संपर्क काही काळ तुटला होता. नांदेड महापालिका आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या घरात पाणी घुसले. जिल्ह्यातील अनेक छोट्या छोट्या पुलांवरून पाणी ओसंडुन वाहात होते. विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे सतर्क राहण्याचे आदेश दिले होते.
नद्यांना आले पाणी
रविवारी मराठवाड्यातील अनेक नदी-नाले भरून वाहू लागले. पैठण तालुक्यातील विरभद्रा नदी, सुलोचना नदी, गलाठी नदी, शिरुर अनंतपाल तालुक्यातील येरोळ-कारेवाडी नदी, निलंगा तालुक्यातील मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली. उस्मानाबाद जिल्ह्यात शनिवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठ्यांत वाढ झाली आहे. लातूर तालुक्यातील नागझरी येथील उच्चतम बंधाराचे दारे उघडण्यात आले आहेत.
अजूनही चिंता कायम
दोन दिवसांपासून जरी पाऊस पडत असला तरी खूप विलंब झाला आहे हेदेखील सत्य आहे. मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४३.१७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच याच काळात ५७.५२ टक्के पावसाची नोंद आहे. विभागात २० आॅगस्टपर्यंत सरासरी पर्जन्यमान ४७१.१८ मि.मी एवढे असून आतापर्यंत केवळ ३३६.३२ मि.मी. पाऊस पडला आहे. सोयाबीन व काही प्रमाणात खरिपाच्या लाभा व्यतिरिक्त फारसे समाधानकारक चित्र नाही.
मराठवाड्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमान
जिल्ह्यांचे नाव पाऊस (मि.मी.)
लातूर १०४.५५
नांदेड १००.८६
बीड ६८.४७
उस्मानाबद ६५.०९
हिंगोली ४४.९६
परभणी ४२.२१
औरंगाबाद ३५.४७
जालना ३२.१९