परीक्षेला सात हजार नवसाक्षर

By Admin | Updated: March 21, 2016 00:21 IST2016-03-21T00:11:01+5:302016-03-21T00:21:42+5:30

उस्मानाबाद/उमरगा : राष्ट्रीय साक्षर परिषद व साक्षर भारत अभियानच्या वतीने रविवारी नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली.

Seven thousand novels in the test | परीक्षेला सात हजार नवसाक्षर

परीक्षेला सात हजार नवसाक्षर


उस्मानाबाद/उमरगा : राष्ट्रीय साक्षर परिषद व साक्षर भारत अभियानच्या वतीने रविवारी नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. जिल्हाभरातील सुमारे ६२० केंद्रातून तब्बल सात हजारांपेक्षा अधिक नवसाक्षरांनी परीक्षा दिली. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा तब्बल दोन हजारांनी परीक्षार्थींची संख्या वाढली आहे.
परीक्षा केंद्रावर त्या-त्या शाळेतील मुख्याध्यापकांची केंद्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. राष्ट्रीय मुल्य, शासकीय योजना, विज्ञान, गणित, भाषा कौशल्य, अंकज्ञान, म्हणींचा उपयोग, कविता व गाण्यांच्या ओळी, परिच्छेद लेखन कौशल्य आदी विविध विषयावर आधारित प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी महिलांची संख्या लक्षणीय होती. गतवर्षी जिल्हाभरातून सुमारे पाच हजाराच्या आसपास नवसाक्षरांनी परीक्षा दिली होती. यंदा मात्र ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. किमान दहा हजार नवसाक्षर परीक्षेला बसतील, असा अंदाज निरंतर शिक्षण विभागाचा होता. प्रत्यक्षात मात्र सात हजार नवसाक्षरांनी परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी पथकेही स्थापन करण्यात आली होती. तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच शिक्षण संचालक कार्यालय पुणे, ‘एनआयओएस’ आणि राज्य साधन केंद्राचे प्रतिनिधींनीही केंद्रांना भेटी दिल्या. सदरील परीक्षा सुरळीत पार पडली, असे निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कसगीत दिली ३२६ जणांनी परीक्षा
तालुक्यातील कसगी या गावाचा केंद्र शासनाच्या संसद आदर्श गावामध्ये समावेश करण्यात आला आहे. या गावातील परीक्षेसाठी ३५६ प्रौढ महिला पुरुषांनी नोंदणी केली होती. त्यापैकी आज झालेल्या परीक्षेत ३२६ प्रौढ महिला पुरुषांनी परीक्षा दिली. त्यात लोक वाचनालयाच्या परीक्षा केंद्रावर १८ पुरुषांनी तर ७२ स्त्रिया असे एकूण ९० जणांनी परीक्षा दिली. जि.प. शाळेच्या परीक्षा केंद्रात ११ पुरुष व ५ महिला परीक्षेला बसल्या होत्त्या. चनपटणे नगरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर विविध बचत गटाच्या पाच पुरुषांनी तर ५९ महिलांनी परीक्षा दिली. कसगी येथील परीक्षेची संपूर्ण जबाबदारी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. जि.प. शाळा, वाचनालय, भीमनगर, कसगीवाडी या चार परीक्षा केंद्रावर शालिनी साबळे, रुपा पतंगे, मंगल कसबे, मंगल मुळजे, आदिती कुलकर्णी, रामेश्वर मदने, ज्योति गाढवे यांनी काम पाहिले. रविवारी दिवसभर जि.प. च्या शाळामधील परीक्षा केंद्रावर प्रौढ नवसाक्षरांची मोठी लगबग सुरु असल्याने रविवारीही शाळा सुरु असल्याचे दिसून आले. प्रौढ निरंतर विभागाचे सहाय्यक प्रकल्पाधिकारी संजीवन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्र्शनाखाली विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Seven thousand novels in the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.