औरंगाबाद : छाती दुखू लागल्यावर रुग्णांची अँजिओग्राफी करण्यात येते. घाटी रुग्णालयात अँजिओग्राफीसाठी दररोज अनेक रुग्ण येतात. परंतु अँजिओग्राफीसाठी तब्बल सात महिन्यांनंतर येण्याचा अजब सल्ला घाटी रुग्णालयाकडून सध्या रुग्णांना दिला जात आहे. त्यामुळे छातीत कळ आली तर सात महिने प्रतीक्षा करा अन्यथा खाजगी रुग्णालयाचा रस्ता धरा, अशी वेळ गोरगरीब रुग्णांवर येत आहे. घाटीच्या या अजब कारभाराविषयी रुग्णांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मराठवाड्यातील पहिला शासकीय हृदयरोग आणि उरोशल्यचिकित्सा विभाग सहा वर्षांपूर्वी घाटी रुग्णालयात सुरू झाला. तेथे अत्याधुनिक स्वतंत्र आॅपरेशन थिएटर, आयसीयू, महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आहेत. विभाग सुरू झाल्यामुळे तेथे रोज दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयरोग म्हटले की, शक्यतो रुग्णांना रक्त तपासणी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या प्रक्रियांना सामोरे जावे लागते; परंतु या ठिकाणी आल्यावर अँजिओग्राफीसाठी रुग्णांना सात महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. याठिकाणी तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने बाहेरचे तज्ज्ञ येतात आणि काही जणांची अँजिओग्राफी करून जातात. त्यामुळे अँजिओग्राफी होत नसल्याचे रुग्णांनी सांगितले.
अँजिओग्राफीसाठी सात महिन्यांचे ‘वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:05 IST