सेतूच्या घरपोच प्रमाणपत्र सुविधेस प्रारंभ
By Admin | Updated: June 8, 2014 01:14 IST2014-06-08T01:03:54+5:302014-06-08T01:14:21+5:30
औरंगाबाद : शाळा, महाविद्यालये सुरू होण्याआधी विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची एकच गर्दी उसळली आहे

सेतूच्या घरपोच प्रमाणपत्र सुविधेस प्रारंभ
औरंगाबाद : शाळा, महाविद्यालये सुरू होण्याआधी विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांची एकच गर्दी उसळली आहे. ही गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने यंदाही घरपोच प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे उद्या शनिवारपासून एका फोन कॉलवर विद्यार्थ्यांना घरपोच प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.
चालू महिन्यात शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. त्याआधी प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तयारी चालविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात या प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलेअर, राष्ट्रीयत्व, ३० टक्के महिला आरक्षण, भूमिहीन आदी प्रमाणपत्रांसाठी मोठ्या संख्येने अर्ज केले जात आहेत. सेतूवरील ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने सेतू सुविधा केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे. याही पुढे जाऊन प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरपोच प्रमाणपत्र देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे यांनी सांगितले की, घरपोच प्रमाणपत्र मिळण्यासाठी ०२४०-२१००५९० या क्रमांकावर संपर्क सधावा लागणार आहे.
वरील क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर सेतू सुविधा केंद्राचा कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर जाईल. तेथून प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून तो परत सेतू सुविधा केंद्रात येईल. त्यानंतर आठवडाभराच्या आत संबंधित व्यक्तीला घरपोच प्रमाणपत्र दिले जाईल.
घरपोच सुविधेसाठी प्रमाणपत्राच्या नियमित फीपेक्षा काही रक्कम जास्तीची घेतली जाणार आहे. तसेच कोणत्याही प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली तरच ते प्रमाणपत्र दिले जाईल अन्यथा नाही.
मार्गदर्शकांचीही नियुक्ती
सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी दोन मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेतू सुविधा केंद्राबाहेर टेबल टाकून हे मार्गदर्शक बसत आहेत. कोणत्या प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे सादर करावीत, प्रमाणपत्राचे शुल्क कुठे भरावे, कोणत्या प्रमाणपत्रासाठी कुठे जावे या सर्व प्रश्नांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे.