बाबासाहेबांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ स्थापणार
By Admin | Updated: January 15, 2016 00:13 IST2016-01-14T23:53:28+5:302016-01-15T00:13:16+5:30
औरंगाबाद : विद्यापीठ नामविस्तार आम्हाला अमान्य आहे. नामांतराचा लढा हा नामविस्तारात रूपांतरित होणे आंबेडकरी चळवळीचा पराभव होय

बाबासाहेबांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ स्थापणार
औरंगाबाद : विद्यापीठ नामविस्तार आम्हाला अमान्य आहे. नामांतराचा लढा हा नामविस्तारात रूपांतरित होणे आंबेडकरी चळवळीचा पराभव होय आणि म्हणून औरंगाबादच्या नागसेनवनात आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार आहोत, अशी घोषणा रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी एका पत्रपरिषदेत केली. नामांतर लढ्याचे सामाजिक व राजकीय आॅडिट झाले पाहिजे, असा आग्रहही त्यांनी यावेळी धरला.
त्यांनी सांगितले की, आंबेडकरी चळवळीतील सर्व विघटित नेत्यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आर्थिक विकासाच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना फोडून आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करीत आनंदराज आंबेडकर यांनी, सर्व आंबेडकरी बौद्ध नेत्यांनी मोदींच्या सत्तेच्या मोहमायेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पीईएसचे न्यायालयीन वाद लवकरच मिटतील व त्यानंतर नागसेनवनात स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला संजीव बोधनकर, बंडूभाऊ प्रधान, भाई सावंत, के. व्ही. मोरे, प्रा. विजयकुमार घोरपडे, प्रशांत म्हस्के, रूपचंद गाडेकर, प्रा. सिद्धोधन मोरे, सचिन निकम, आनंद नेरलीकर आदींची उपस्थिती होती.
...ही चीड आणणारी बाब
नामांतर लढ्यातील शहिदांचे साधे स्मारकही होऊ नये ही चीड आणणारी बाब होय. नागपूर मनपाच्या वतीने असे स्मारक उभे राहिलेले आहे. औरंगाबाद शहराला आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणता मग येथे स्वत:ला आंबेडकरी म्हणविणारे नगरसेवक, अधिकारी व विचारवंत झोपले आहेत काय, असा माझा सवाल आहे. नामविस्ताराच्या बदल्यात अॅट्रॉसिटीचे पाच हजार प्रकरणे मागे घेण्यात आली. सिंहासनाचा मोह न आवरल्यामुळे नामांतराऐवजी नामविस्ताराचा प्रस्ताव स्वीकारला गेला, असा आक्षेपही आंबेडकर यांनी घेतला.