सेना-भाजपाला दोन महिन्यात सत्तेची मस्ती
By Admin | Updated: August 2, 2014 01:40 IST2014-08-02T01:10:11+5:302014-08-02T01:40:36+5:30
उस्मानाबाद : ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे स्वप्न दाखवित मोदी सरकारने केंद्रात सत्ता मिळविली.

सेना-भाजपाला दोन महिन्यात सत्तेची मस्ती
उस्मानाबाद : ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असे स्वप्न दाखवित मोदी सरकारने केंद्रात सत्ता मिळविली. मात्र त्यानंतर पेट्रोल, गॅस, रेल्वे भाडेवाढ करून या सरकारने अवघ्या दोन महिन्यात सर्वसामान्यांचा विश्वास गमावला आहे. सत्तेची मस्ती आल्यानेच यांनी महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्याच्या तोंडात चपाती कोंबण्याचा प्रयत्न केल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा किरकोळ अपघातात मृत्यू झाला. त्याची चौकशी सुरू असली तरी त्याबद्दल केंद्र सरकार काहीच बोलत नाही. या अपघातामागची वस्तूस्थिती लोकांना कळू द्या, असेही पवार यावेळी म्हणाले.
येथील छायादीप लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निर्धार मेळाव्यानंतर शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जो काम करतो, त्याच्याकडूनच चुका होतात. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आघाडीने मागील पाच वर्षात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. मात्र या कामाचे मार्केटींग आमच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना जमले नाही. त्यामुळेच आघाडीचा पराभव झाला. मात्र पराभवाने खचून जाणाऱ्यातले आम्ही नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जातीयवादी पक्षांचा पराभव करून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवू असा विश्वासही पवार यांनी यावेळी व्यक्त केला. युपीएची सत्ता असताना केंद्र व राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ, गारपीट तसेच इतर कारणासाठी तब्बल १३ हजार कोटीची नुकसान भरपाई दिली. शरद पवार यांच्या रुपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा नेता केंद्रात असल्यानेच हे शक्य झाल्याचेही ते म्हणाले. सेना-भाजपने नेहमीच काम करणाऱ्या नेत्यांनाच टिकेचे लक्ष्य केले. गोपीनाथ मुंडे हेही यामधून सुटले नव्हते. बहुजन समाजाच्या या नेत्याचा एका किरकोळ अपघातात मृत्यू होतो. मराठवाड्यासह राज्यातील जनतेच्या मागणीनंतर त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले असले तरी सरकार त्याबद्दल काहीही बोलत नाही. मुंडे यांच्या अपघाताबाबतची वस्तूस्थिती लोकांना कळली पाहिजे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
गृहमंत्र्यांकडे विचारणा करणार..
दारूबंदीची मागणी करणाऱ्या कनगरा येथील ग्रामस्थांना पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कनगरा येथे येऊन ग्रामस्थांची जाहीर माफी मागितली होती. याबरोबरच याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल तसेच त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली होती. मात्र दोन महिने उलटले तरीही कसलीही कार्यवाही झाली नसल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, गृहमंत्री दिलेला शब्द पाळतात, असा अनुभव आहे. मुंबईत गेल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडून कनगरा प्रकरणी नेमकी काय कार्यवाही झाली? याची माहिती घेऊ, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
१४४ जागांवर ठाम
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ खासदार निवडून आले होते. त्यावेळी बळ वाढल्याचे सांगत, काँग्रेसने विधानसभेच्या जागा वाढवून मागितल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा खासदार निवडून आले आहेत. मात्र आम्ही जादा जागेची मागणी करणार नसलो तरी १४४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याच पाहिजेत, असे सांगत, या आकड्यावर आम्ही ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पुरोगामी विचारांच्या पक्षानी एकत्रित येऊन सन्मानपूर्वक जागा वाटप करण्याची गरज असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.