ज्येष्ठांची शारीरिक, मानसिक काळजी गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:04 IST2021-06-17T04:04:41+5:302021-06-17T04:04:41+5:30
औरंगाबाद : देशात सध्या वृद्धांची संख्या १० ते १२ कोटी आहे, ती येत्या २० वर्षांत दुप्पट होईल तेव्हा ...

ज्येष्ठांची शारीरिक, मानसिक काळजी गरजेची
औरंगाबाद : देशात सध्या वृद्धांची संख्या १० ते १२ कोटी आहे, ती येत्या २० वर्षांत दुप्पट होईल तेव्हा आतापासूनच आपण ज्येष्ठांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि पुढचे नियोजन केले पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या गैरवर्तनाच्या जनजागृती दिनानिमित्त घाटीच्या वार्धक्यशास्त्र विभाग आणि आयएमएतर्फे वेबिनार घेण्यात आले. यावेळी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ज्येष्ठांना याचक म्हणून वागणूक न देता सन्मानपूृर्वक जी होईल ती मदत करायला पाहिजे, असे मत मांडले. ते म्हणाले की, जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन, विशेषत: ग्रामीण भागात वृद्धांसाठी डे -केअर होम, आधार कार्ड इत्यादी काढून मिळणे, त्यांचे पोषण, शासनाच्या इतर योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील यावर भर देण्यात येईल. घरी वाळवण करणे, वाती वळणे आदी छोटे व्यवसाय करता आले तर त्यासाठी शासन साहाय्य करेल.
घाटीच्या वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. मंगला बोरकर यांनी गैरवर्तनाचे प्रकार (मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास आणि वृद्धांना सोडून देणे) याबद्दल माहिती दिली. डॉ. नरेंद्र वैद्य यांनी, वृध्दाश्रम न म्हणता ज्येष्ठघर म्हणावे आणि त्यांना तेथे घरच्यासारखे वातावरण निर्माण करून उर्वरित आयुष्य चांगले कसे जगता येईल याविषयी माहिती दिली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सामाजिक स्तरापासून वेगवेगळ्या कायद्यांची मदत घेऊन ज्येष्ठांवर होणारे गैरवर्तन कसे रोखता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष रांजलकर, सूत्रसंचालन घाटी रुग्णालयाच्या वार्धक्यशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलजा राव यांनी केले. यासाठी डॉ. महेश पाटील, डॉ. आशिष राजन, डॉ. झेबा फिरदोस, डॉ. श्रुती कर्णिक, डॉ. साधना जायभाये, डॉ. पंकज महाजन, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. कहेकशा फारुकी, डॉ. मोमिन आयेशा, राहुल बोधनकर यांनी परिश्रम घेतले.