निवडा आवडीचे क्षेत्र..अन् घ्या गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2016 01:09 IST2016-06-21T01:03:09+5:302016-06-21T01:09:11+5:30
औरंगाबाद : तयार झालेले वृत्तपत्र घराघरांत नेऊन देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात, ते आपले वृत्तपत्र विक्रे ते बंधू. वृत्तपत्र समूहाचा जणू ते मोठा आधार असतात.

निवडा आवडीचे क्षेत्र..अन् घ्या गगनभरारी
औरंगाबाद : तयार झालेले वृत्तपत्र घराघरांत नेऊन देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात, ते आपले वृत्तपत्र विक्रे ते बंधू. वृत्तपत्र समूहाचा जणू ते मोठा आधार असतात. या वृत्तपत्र विक्रे त्या सहकाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा लोकमत भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा त्यांच्या पालकांसहित मान्यवर अतिथींच्या हस्ते यानिमित्ताने गौरव करण्यात आला. याप्रसंगी डीसीपी राहुल श्रीरामे, मिस इंडिया युनिव्हर्सची रनर अप नवेली देशमुख, ‘सैराट’ चित्रपटात परशाच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते संभाजी तांगडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, सारा बिल्डर्सचे चेअरमन सीताराम अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवर तसेच लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, वितरण विभागाचे उपाध्यक्ष वसंत आवारी, औरंगाबाद जिल्हा वृत्तपत्र विक्रे ता संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जगताप, सचिव नीलेश फाटके, संघटनेचे पदाधिकारी गणेश भोसले, मोहम्मद फहिम आदींच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अभ्यासापेक्षाही आयुष्यात इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या आवडीनुसार आपले करिअर निवडा, सामान्य विद्यार्थीही आयुष्यात खूप काही मिळवू शकतो, असा विश्वास डीसीपी श्रीरामे यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
आजच्या तरुणाईचा आयकॉन ठरलेल्या नवेली देशमुखने दहावी व बारावी हा महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडल्यानंतर विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक त्यांचे मनपसंत करिअर निवडावे, असा सल्ला दिला.
जीवनात यशस्वी होण्यासाठी पैसा किंवा परिस्थिती अनुकूल पाहिजे असे काही नसते, त्यामुळे परिस्थितीचा अजिबात दबाव घेऊ नका, असा मार्मिक उपदेश उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना के ला. सीताराम अग्रवाल म्हणाले की, आयुष्यात संकटे येतात, त्यामुळे संकटे आल्यावर त्यापुढे हतबल न होता, त्यातून यशस्वीपणे मार्ग काढणे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे, याप्रसंगी वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, तसेच वितरण विभागातील सर्व सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
आईने मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरात नुकतीच घडली. या घटनेत जिगीषा फड या चिमुरडीचे प्राण वाचले ते वृत्तपत्र विक्रेते बंधू परसराम गायके यांच्यामुळे. या कार्यक्रमात डीसीपी राहुल श्रीरामे यांच्या हस्ते गायके यांचाही सत्कार करण्यात आला.
आपल्या सहज, सोप्या भाषेत बोलायला सुरुवात करून अभिनेते संभाजी तांगडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. कोण किती यशस्वी आहे, हे ठरविण्यासाठी ‘टक्के’ हा काही मापदंड नव्हे, नापास होणाराही आयुष्यात खूप मोठा होऊ शकतो, असे त्यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.ग्रामीण भागातील असूनही आपल्या वडिलांनी आपण निवडलेल्या करिअरला पाठबळ दिले, त्यांच्या विश्वासामुळेच आज आपण इथपर्यंत येऊ शकलो, असे ते म्हणाले. आपल्या इच्छा मुलांवर न लादता त्यांच्या सुप्त गुणांना बाहेर काढून, मुलांना मुक्तपणे उडू द्या, अशी विनंती त्यांनी पालकांना केली. उपस्थितांच्या आग्रहास्तव ‘सैराट’ चित्रपटातील संवादही त्यांनी म्हटले.