घरचे बियाणेच फायदेशीर

By Admin | Updated: May 11, 2014 00:40 IST2014-05-11T00:31:17+5:302014-05-11T00:40:31+5:30

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे़

The seeds of the house are beneficial | घरचे बियाणेच फायदेशीर

घरचे बियाणेच फायदेशीर

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासू शकतो़ परंतु, शेतकर्‍यांनी स्वत:कडील घरचे बियाणे वापरले तर ते त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे़ मागील हंगामात सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढणीच्या काळातच वादळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली़ त्यामुळे उत्पादन घटले व त्याचा बियाणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे़ येत्या हंगामात सोयाबीन बियाणांची कमतरता पडण्याची शक्यता आहे़ शेतकर्‍यांनी विविध कंपन्यांचे विक्रीसाठी आलेल्या सोयाबीन बियाणांचा आग्रह न धरता स्वत:कडील बियाणे वापरावेत़ खरीप हंगामासाठी गेल्यावर्षी प्रमाणिक बियाणांपासून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नातून स्वत:कडील बियाणे पेरणीसाठी वापरावेत़ सोयाबीनच्या पेरणीसाठी प्रतीहेक्टरी ७५ किलो ग्रॅम म्हणजेच एका एकरला ३० किलो बियाणे लागते़ यात सूत्राप्रमाणे क्षेत्रानुसार पेरणीपूर्वी बियाणे उपलब्ध करून स्वच्छ करून ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) तीन वर्षे वापरता येते बियाणे सोयाबीन हे स्वपराग सिंचित पीक असून, पेरलेल्या वाणाचे गुणधर्म व त्यापासून उत्पादित सोयाबीन बियाणे यामध्ये अधिक तफावत आढळत नाही़ सोयाबीन पिकाच्या लागवडीमध्ये वापरण्यात येणारे बियाणे हे सरळ वाण असल्याने बियाणे प्रत्येक वर्षी बदलण्याची गरज नसते़ एकदा प्रमाणित बियाणे पेरल्यानंतर त्यापासून उत्पादित सतत तीन वर्षांपर्यंत वापरता येते़ उगवणशक्तीची तपासणी सोयाबीन पिकाच्या बियाणात अंकुर हे आवरणालगतच असून ते अतिशय नाजूक असते़ बाहेरून होणार्‍या आघातामुळे बियाणास नुकसान होऊन त्याची उगवण क्षमता कमी होण्याची शक्यता असते़ त्यामुळे सोयाबीनचे बियाणे असणारे पोते उंचीवरून फेकू नये किंवा बियाणे आदळणार नाही, याची काळजी घ्यावी़ मागील वर्षी उत्पादित घरचे बियाणे वापरणार असल्यास त्याची उगवणक्षमता तपासणे आवश्यक आहे़ ही उगवणक्षमता घरच्या घरी तपासता येते़ यासाठी आपण जे सोयाबीन बियाणे वापरणार आहोत त्यातून काडी कचरा निवडून बिया मोजून घ्याव्यात़ हे बियाणे ओले कापड किंवा रद्दी पेपरमध्ये ४ ते ५ दिवसांसाठी गुंडाळून ठेवावे़ बियाणे ठेवलेल्या कापडावर किंवा पेपरवर एक-दोन दिवसाआड पाणी हलके शिंपडावे़ बियाणे उगवण्यासाठी सोयाबीन पिकास चार-पाच दिवस लागतात़ पाच दिवसानंतर बियाणे अंकुरल्यास ठेवलेले कापड किंवा पेपर काढून त्यातील उगवण झालेल्या सोयाबीनच्या बियाणांची संख्या मोजावी़ सोयाबीन पिकासाठी उगवणशक्ती किमान ७० टक्के असावी़ म्हणजे अंकुरण्यासाठी टाकलेल्या १०० पैकी किमान ७० बियांची उगवण होणे आवश्यक आहे़ घरचे बियाणे वापरताना अशा प्रकारे उगवण क्षमता तपासणीतून योग्य असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन वनामकृविने केले आहे़

Web Title: The seeds of the house are beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.