दुसऱ्या ठरावाने दिग्गजांना तारले, चुरस वाढणार!

By Admin | Updated: March 27, 2015 00:39 IST2015-03-27T00:34:10+5:302015-03-27T00:39:24+5:30

उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या निवडणूक मतदार यादीसाठी दाखल ८८९ पैकी तब्बल २१५ सोसायट्यांचे ठराव न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहेत़

The second option will save the stalwarts and increase them! | दुसऱ्या ठरावाने दिग्गजांना तारले, चुरस वाढणार!

दुसऱ्या ठरावाने दिग्गजांना तारले, चुरस वाढणार!


उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या निवडणूक मतदार यादीसाठी दाखल ८८९ पैकी तब्बल २१५ सोसायट्यांचे ठराव न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहेत़ मात्र, काही मतदार संघातून प्रत्येकी दोन ठराव दाखल झाले होते़ यापैैकी एक ठराव अपात्र ठरला असला तरी दुसरा वैैध ठरला आहे़ यामुळे विद्यमान चेअरमन बापूराव पाटील, संचालक तथा आमदार राहूल मोटे, सतीश दंडनाईक, विश्वास शिंदे व इतर काही राजकीय मंडळी ही बाब दिलासादायक ठरली आहे़ दरम्यान, सोसायटी मतदार संघ वगळता इतर मतदार संघातील ठरावामुळे या मंडळींसमोरील निवडणुकीतील चुरस मात्र, वाढणार आहे़
जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या जोरदार हलचाली सुरू आहेत़ सहकार खात्याच्या नवीन कायद्यामुळे अनेक राजकीय पुढाऱ्यांना अगोदरच मोठा झटका बसला आहे़ त्यामुळे संस्थेच्या एकूण २३०० संस्था मतदारांपैकी केवळ ८५३ ठराव पात्र ठरले होते़ उर्वरित संस्था या थकबाकीदार, शेअर्स नसल्याने त्या संस्था प्रारंभीच मतदार यादीतून वगळण्यात आल्या होत्या़ त्यामुळे अनेक इच्छुकांचा मतदार यादीत नाव येणार नसल्याने हिरमूस झाला होता़ त्यानंतरच्या काळात ८५३ संस्थांचे ठराव आले होते़ नंतर ३६ संस्थांनी शेअर्स भरल्याने त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याने ८८९ मतदार ठराव पात्र होते़ अपात्र ठरलेल्या संस्थांनी निवडणूक विभागाकडे आक्षेप नोंदविले होते़ अंतीम यादी प्रसिध्द होण्यापूर्वीच बीड जिल्ह्यातून एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती़ याच्या निकालात ज्या संस्थांच्या वेळेत निवडणुका झालेल्या नाहीत, अशा संस्था ठराव पाठविण्याचा निर्णय घेण्यासाठी सक्षम नसल्याचे न्यायालयाने सांगितले़ न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ८८९ पैकी तब्बल २१५ संस्थांचे ठराव अपात्र ठरविले आहेत़ या निर्णयाचा सर्वाधिक फटका राजकीय नेतेमंडळींना बसला आहे़
काँग्रेसचे नेते तथा डीसीसीचे चेअरमन बापूराव पाटील, विश्वास शिंदे, दीपक जवळगे, प्रशांत चेडे, बिभिषण खामकर, मुकुंद डोंगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, संचालक तथा आमदार राहूल मोटे, शिवाजीराव नाईकवाडी, सतीश दंडनाईक, मनोगत शिनगारे, राहूल काकासाहेब पाटील, सुहास पाटील, विकास बारकूल यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, राहूल पडवळ, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, उदयसिंह निंबाळकर, अनिल काळे या राजकीय नेतेमंडळींसह २१५ जणांचे ठराव अपात्र ठरले आहेत़
यातील काहींचा एक ठराव अपात्र ठरला असला तरी दुसरा ठराव वैध ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे़ यामध्ये चेअरमन बापूराव पाटील यांच्यासह सतीश दंडनाईक यांचा इतर बिगरशेती सहकारी संस्था गटातील ठराव वैैध ठरला आहे़ तसेच नागरी बँका, पतसंस्था, पगारदार नोकरदारांच्या पतसंस्था मतदार संघातून विश्वास शिंदे यांचा ठराव वैैध ठरला आहे़ तर जवळा सोसायटीतून आलेला राहूल महारूद्र मोटे यांचा ठराव अपात्र ठरला असून, गिरवली सोसायटीचा ठराव मात्र, वैैध ठरला आहे़ तर काँग्रेसचे नेते प्रशांत चेडे यांचा शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचा ठराव अपात्र ठरला असून, वाशी सोसायटीकडून आलेला ठराव वैैध ठरला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The second option will save the stalwarts and increase them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.