बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध घ्या हो...
By Admin | Updated: June 26, 2014 00:59 IST2014-06-26T00:49:37+5:302014-06-26T00:59:33+5:30
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथून साडेतीन महिन्यांपूर्वी त्याची बहीण बेपत्ता झाली. सर्व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला; परंतु बहीण काही सापडली नाही.

बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध घ्या हो...
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथून साडेतीन महिन्यांपूर्वी त्याची बहीण बेपत्ता झाली. सर्व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला; परंतु बहीण काही सापडली नाही. आज परत येईल, उद्या परत येईल, अशी प्रतीक्षा करीत काही दिवस उलटले; परंतु ती काही आली नाही. अखेर देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
सासरच्यांनी घातपात करून बहिणीचा खून केल्याचा संशय त्याला आला. तशी तक्रारही दाखल करण्यात आली; परंतु बेपत्ता बहिणीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी तिच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. या प्रकारामुळे हतबल झालेल्या भावाने आई-वडील आणि चिमुकल्या भाचीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सोमीनाथ काळे (रा. येसगाव, ता. खुलताबाद) असे या भावाचे नाव आहे.
सोमनाथसह त्याचे वडील बालू मालकर आणि आई रुख्मणबाई मालकर यांचा उपोषणार्थीत समावेश आहे. सोमीनाथची बहीण कीर्ती हिचा विवाह ताडपिंपळगाव येथील सोपान मालकरशी १७ एप्रिल २००६ रोजी झाला. सुरुवातीची दोन-तीन वर्षे तिला सुखाने नांदवले. कीर्तीच्या संसाराला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मधुर फळेदेखील लागली. त्यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी कीर्तीचा छळ सुरू झाला. काही दिवस चांगले वागविल्यानंतर पुन्हा त्रास दिला जायचा, असे चक्रच सुरू झाले. या प्रकरणी मालकर कुटुंबियांविरुद्ध हुंडाबळीची तक्रारही करण्यात आली. प्रकरण पोलिसांत गेले, कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. परिणामी कीर्तीवर फारकत घेण्यासाठी दबाब वाढविण्यात आला. फारकतीसाठी साडेतीन लाख रुपये रोख किंवा दोन एकर जमीन देण्याचे आमिषही दाखवले जायचे.
अखेर तिने घर सोडले. सासुरवाडीतच भाड्याच्या घरात ती राहू लागली. त्यात मुलांचीही ताटातूट झाली. मुलगा वडिलांकडे, तर मुलगी कीर्तीसोबत राहू लागली.
पोलिसांचा बेजबाबदारपणा
पुण्याहून परतल्यानंतर सोमीनाथ आणि त्याचा मित्र दीपक काळे हे येसगावला गेले. कीर्तीचे घर बंद असल्याचे त्यांना आढळले. दहा-बारा दिवसांपासून कीर्ती घरी दिसत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर २ एप्रिल रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर कीर्तीच्या घराचे कुलूप तोडून पोलिसांनी तपासणी केली; परंतु त्यात काही आढळले नाही. कीर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्याची जबाबदारी तिच्या पती व सासरच्या इतर मंडळींची होती; परंतु त्यांनी ती पार पाडली नाही. आता ते याबाबत बोलतही नाहीत. पती सोपान मालकर याच्यासह सासरच्या इतर मंडळींनीच तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप सोमीनाथने केला आहे. देवगाव रंगारी पोलीसही तक्रारीची दखल घेत नाहीत, उलट कीर्तीच्याच चारित्र्यावर ते चिखलफेक करीत असल्याचा आरोप सोमीनाथने केला.
अखेरचे बोलणे
सोमनाथच्या म्हणण्यानुसार, १८ मार्च २०१४ रोजी ८३८०८४१८९६ या क्रमांकावरून त्याच्या मोबाईलवर ‘मिस कॉल’ आला. त्याने फोन केला असता, पलीकडून कीर्ती बोलत होती. ३१ मार्चला असणाऱ्या येसगावच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण सोमनाथने दिले. तिनेही ते स्वीकारले. हेच कीर्तीशी अखेरचे बोलणे होते, असे सोमनाथने सांगितले. त्यानंतर तिचा फोनच बंद झाला. काही दिवसाने सोमीनाथ हा आपल्या भाऊ व भावजयीसाठी पुण्याला कामानिमित्त गेला. कीर्ती बेपत्ता झाल्याचे समजले.