चांडेश्वरच्या रेशन दुकानास तहसीलदारांनी ठोकले सील
By Admin | Updated: June 22, 2014 00:06 IST2014-06-21T23:53:49+5:302014-06-22T00:06:30+5:30
लातूर : तालुक्यातील चांडेश्वर येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांसाठींच्या धान्याच्या परिमाणाच्या पावत्यांवर दुसऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे शनिवारी आढळून आले़

चांडेश्वरच्या रेशन दुकानास तहसीलदारांनी ठोकले सील
लातूर : तालुक्यातील चांडेश्वर येथील एका स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांसाठींच्या धान्याच्या परिमाणाच्या पावत्यांवर दुसऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे शनिवारी आढळून आले़ त्यामुळे तहसीलदारांनी रेशन दुकानातील दफतर जप्त करून दुकानास सील ठोकण्याची कारवाई केली आहे़
लातूर तालुक्यातील चांडेश्वर येथील स्वस्त धान्य दुकानदार विजयकुमार सपाटे हे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत रेशन दुकान उघडत नाहीत़
तसेच शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य देत नाहीत़ रेशनकार्डधारकांनी धान्य घेतल्यानंतर त्याची पावती देण्यास टाळाटाळ करतात तसेच शिधापत्रिकाधारकांच्या माथी निकृष्ट दर्जाचे धान्य देतात अशा तक्रारी गावातील काही नागरिकांनी तहसीलदारांकडे केल्या होत्या़ वारंवार तक्रारी येत असल्याचे पाहून तहसीलदार महेश शेवाळे यांनी शनिवारी या रेशनदुकानाची तपासणी केली़ तेव्हा दुकानात ४० शिधापत्रिका आढळून आल्या़ त्या ताब्यात घेऊन दप्तराची तपासणी केली़ तेव्हा गावातील दत्ता घाटगे व तुकाराम भंडारे यांना धान्याच्या देण्यात आलेल्या पावत्यांवर दुसऱ्याच व्यक्तीची स्वाक्षरी आढळून आली़
त्यामुळे तहसीलदार महेश शेवाळे यांनी दुकानातील सर्व दप्तर सील केले. तसेच सील करण्यात आलेले दफतर जप्त करून दुकानास सील ठोकण्याची कारवाई केली आहे़ तसेच जप्त करण्यात आलेल्या सर्व शिधापत्रिका नावानुसार त्या- त्या व्यक्तीस वाटप केले़ (प्रतिनिधी)
शनिवारी अचानकपणे ही कारवाई करण्यात आल्याने गावात एकच चर्चा सुरु होती़ तसेच स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़ याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़