बावीतील शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळं
By Admin | Updated: August 17, 2015 01:04 IST2015-08-17T00:58:51+5:302015-08-17T01:04:35+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील बावी (का़) गावानजीकच्या शेतवस्तीवर शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी तलवारीने हल्ला केल्याने

बावीतील शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळं
उस्मानाबाद : तालुक्यातील बावी (का़) गावानजीकच्या शेतवस्तीवर शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी तलवारीने हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ तर दरोडेखोरांच्या मारहाणीत शेतकऱ्याची पत्नीही जखमी झाली़ या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बावी (का़) येथील केशेगाव मार्गालगत असलेल्या वस्तीवर भारत गणपती वाघमारे (वय-४०) हे पत्नी, मुला-मुलीसह राहतात़ शनिवारी सायंकाळी शेतात काम करून घरी आल्यानंतर ते पत्नी रंजना व लहान मुलगा-मुलीसोबत घरात झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पत्र्यावर दगड पडत असल्याने व दार ठोठावल्याचे जाणवल्याने जवळील कोणीतरी असेल असे समजून भारत वाघमारे यांनी घराचा दरवाजा उघडला़ वाघमारे यांनी घराचा दरवाजा उघडताच बाहेर असलेल्या दरोडेखोरांपैकी एकाने तलवारीने वाघमारे यांच्यावर हल्ला चढविला़ वाघमारे यांना घराच्या बाहेर ओढून नेत जबर मारहाण करण्यास सुरूवात केली़ तर काहींनी घरात घुसून रंजना वाघमारे यांना मारहाण केली़ घरात लहान मुले होती़ रंजना वाघमारे यांनी तत्परता दाखवित घरातील चटणी घेवून चोरट्यांच्या अंगावर फेकली़ आरडाओरड होवू लागल्याने परिसरातील नागरिकही जागे होऊ लागले़ नागरिक जागे कळताच व डोळ्यात चटणी जाताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली़ तोपर्यंत भारत वाघमारे हे चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते़
घटनेची माहिती कळताच गावातील नागरिकांनी वाघमारे यांच्या घराकडे धाव घेऊन चोरट्यांचाही शोध घेतला़ मात्र, चोरट्यांनी तोपर्यंत पलायन केले होते़ तसेच उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोनि बाळासाहेब गावडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला़ जखमी भारत वाघमारे व त्यांच्या पत्नीस उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या प्रकरणी भारत वाघमारे यांनी दिलेल्या जबाबावरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
बावी कावलदरा नजीकच्याच वडगाव सिध्देश्वर गावातही चोरट्यांच्या भितीने युवकांनी शनिवारी रात्रभर जागर केला़ वडगाव नजीकच्या डोंगरी भागात चोरटे आल्याची माहिती मिळाल्यानंतर शेकडो युवकांनी हातात काठ्या-कुऱ्हाडी घेऊन त्या भागात पाहणी केली, परंतु चोरटे दिसले नाहीत़ मात्र, चोरटे आल्याच्या भीतीने वडगावातील काही भागातील युवकांनीही रात्र जागून काढली़