विद्यापीठ परीक्षेत उत्तरपत्रिकांच्या पानांना लागणार कात्री
By Admin | Updated: April 22, 2015 00:38 IST2015-04-22T00:26:48+5:302015-04-22T00:38:17+5:30
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तरपत्रिकांची पाने कमी करण्याचा विचार असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे बोलून दाखविले.

विद्यापीठ परीक्षेत उत्तरपत्रिकांच्या पानांना लागणार कात्री
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तरपत्रिकांची पाने कमी करण्याचा विचार असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे बोलून दाखविले.
मंगळवारी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी येथील जेईएस महाविद्यालयास अचानक भेट दिली. तेव्हा जिल्हा मुल्यांकन केंद्रात मुल्यांकन करत असलेल्या प्राध्यापकांशी कुलगुरूंनी संवाद साधला. एका पेपरची पाहणी करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, २४ पानांच्या उत्तरपत्रिकेत सात-आठ पाने कोरी दिसून आली. त्यावेळी उपस्थित प्राध्यापकांशी याबाबत डॉ. चोपडे यांनी हितगुज करून उत्तरपत्रिका कमी पानांची केली तर योग्य होईल का? याविषयी चर्चा केली.
यावेळी कुलगुरूंसमवेत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देवानंद शिंदे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पोपळघट, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. एस.बी. बजाज, डॉ. एस.व्ही. सोनार, युसूफ, ग्रंथपाल मनीषा सुतार आदींची उपस्थिती होती.