शाळांतील शौचालयाचा वापर ‘कागदावरच’
By Admin | Updated: November 21, 2014 00:47 IST2014-11-21T00:45:57+5:302014-11-21T00:47:24+5:30
उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्व बिंबविले जावे, यासाठी शाळा तेथे प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे.

शाळांतील शौचालयाचा वापर ‘कागदावरच’
उस्मानाबाद : विद्यार्थ्यांच्या मनावर शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्व बिंबविले जावे, यासाठी शाळा तेथे प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून दरवर्षी शौचालयाच्या वापराबाबतचा अहवाल मागविला जातो. त्यावेळी सर्वच शाळांकडून ‘नियमित वापर सुरु आहे’ हा ठरलेला शेरा मारुन अहवाल पाठविला जातो. हा कागदोपत्री खेळ वाड्या-वस्त्यांपासून थेट मुंबईपर्यंत सुरु असतो. दि. १४ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर या कालावधित उस्मानाबादसह जिल्ह्यातील शाळात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमाचा बुधवारी शौचालय दिनाने समारोप झाला. परंतु, खरेच या शाळांमध्ये शौचालये आहेत का? त्यांचा नियमित वापर केला जातो का? असा प्रश्न निर्माण होतो. याच अनुषंगाने ‘लोकमत’ चमुने गुरुवारी जिल्हाभरातील काही शाळांना अचानक भेट दिली. यावेळी अत्यंत विदारक चित्र दिसून आले. अनेक शाळातील शौचालये कुलूपबंद असल्याचे पहावयास मिळाले. तर काही ठिकाणी शौचालयामध्ये दगडगोटे पडल्याचे दिसले. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यावेळी तातडीने उपाययोजना केल्या होत्या. आता पुन्हा हा प्रश्न डोके वर काढण्याच्या स्थितीत आहे. अनेक शाळात अस्वच्छता पसरल्याचेही यावेळी प्रकर्षाने दिसून आले.
दत्ता गायके ल्ल येरमाळा
येथे जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आहेत. एका शाळेचे प्रसाधनगृह कुलूपबंद अवस्थेत आहे. तर मुलींसाठीचे प्रसाधनगृह मोडकळीस आले आहे. शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे पहावयास मिळाले. असुविधांच्या गर्तेत सापडलेल्या या शाळांमध्ये बसूनच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे.
केंद्रीय प्राथमिक शाळा असणाऱ्या येरमाळा येथील शाळेत मुलांची वेगळी तर मुलींची वेगळी अशी स्वतंत्र शाळा आहे. मुलांच्या शाळेत १५४ विद्यार्थी व मुलींच्या शाळेत १२१ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. यासाठी दोन्ही शाळेच्या मिळून १२ शिक्षक व एक शिपाई असा एकूण शिक्षक स्टाफ आहे. मात्र याठिकाणी पूर्णपणे सुविधांचा अभाव असून, पिण्याच्या पाण्याची कसलीही व्यवस्था नाही. पाण्याच्या दोन टाक्या बांधल्या आहेत. यात पाणी नसल्याने विद्यार्थी घरातूनच पाण्याच्या बाटल्या घेवून आपली तहान भागवत असताना दिसत आहे. जून महिन्यात याठिकाणी बोअरही घेतलेले आहे. त्यास पाणीही लागले आहे. मात्र यात मोटार टाकली नसल्याने बोअर पाडून अद्याप याचा उपयोग होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्टेट बँकेने वॉटर फिल्टर तसेच पाण्याची टाकी देवूनही ह्या सगळ्या वस्तू कचऱ्यात पडल्या आहेत. येथील शौचालयाचे पूर्णपणे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र हे पाण्याअभावी बांधल्या दिवसापासूनच कुलूपबंदच आहेत. तसेच मुलांसाठी बांधलेले शौचालय हे पूर्णपणे मोडकळीस आल्याने शौचालयासाठी मुला-मुलींची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तसेच शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. १४ नोव्हेंबर रोजी शासनाने शाळा स्वच्छ करण्याची सक्ती केली. यावर शाळेत वरिष्ठ मंडळींकडून स्वच्छतेचे महत्वही सांगण्यात आले. मात्र शिक्षक वर्गाकडून हा उपक्रम फारसा गांभिर्याने घेतला जात नसल्याचे दिसते.
अमित सोमवंशी ल्ल उस्मानाबाद
शाळेत मुलं गेली म्हणजे आई-वडील बिनधास्त असतात. अनेक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी कुठे आहे तर कुठे नाही. तसेच बांधण्यात आलेल्या शौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून आले तर काही पाण्याअभावी बंद ठेवण्यात आल्याचे दिसले.
उत्तमी येथील पहिली ते आठवी शाळेत ९७ विद्यार्थी आहेत. तेथील स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य दिसून आले. असे असले तरी येथील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय बऱ्यापैकी आहे. नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पळसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शौचालये बांधण्यात आले असले तरी पाण्याची सोय नसल्याने त्याचा नियमित वापर होत नसल्याचे तेथील विद्यार्थ्यांनी सांगितले.
शाळेच्या पाठीमागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नसल्याचे दिसून आले. शाळेसमोरीलच एका शेतकऱ्याच्या शेतातून पाणी आणून विद्यार्थ्यांना पुरविले जाते. शौचालयाचा वापर करायचा झाल्यास दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
संतोष मगर ल्ल तामलवाडी
वडगाव (काटी) शाळेतील प्रसाधनगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. या प्रसाधनगृहाला दरवाजांचा पत्ता नाही. भांड्यामध्ये वाळू आणि विटांचे तुकडे पडलेले आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. विद्यार्थ्यांना घरुनच पाणी आणावे लागते. सदरील शाळेमध्ये जवळपास अडीचशे विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाला गती देण्याचे आवाहन वरिष्ठ कार्यालयाकडून केले जात असतानाच कचऱ्याचे ढिग तुडवत विद्यार्थ्यांसोबतच गुरुजींनाही शाळेत प्रवेश करावा लागत आहे. याबाबत विद्यार्थ्यांतूनही नाराजी व्यक्त होत आहे.
गुरुजींना बाटलीबंद पाणी
शाळेच्या आवारात पाण्याची टाकी आहे. मात्र ती कोरडीठाक पडली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरुजी घरुनच पाण्याच्या बाटल्या भरुन घेवून येत आहेत.