जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:11 IST2021-02-05T04:11:27+5:302021-02-05T04:11:27+5:30

जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच! ‘वेट अँड वॉच’ : विद्यार्थ्यांना सतावते आपल्या भवितव्याची चिंता औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव ...

Schools in the district continue; Colleges only closed! | जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच!

जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच!

जिल्ह्यातील शाळा सुरू; महाविद्यालये मात्र बंदच! ‘वेट अँड वॉच’ : विद्यार्थ्यांना सतावते आपल्या भवितव्याची चिंता

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे तब्बल दहा महिन्यांनंतर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविद्यालये कधी उघडणार, याकडे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक आणि प्राचार्यांचे लक्ष लागले आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि लॉकडाऊन जाहीर झाले. तेव्हापासून महाविद्यालये बंदच असून, अद्यापही ती उघडलेली नाहीत. २३ नोव्हेंबरपासून शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. अलीकडे बऱ्यापैकी कोरोना आटोक्यात आल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळाही सुरू झाली. मात्र, महाविद्यालये सुरू करण्याबाबत शासनाने अजूनही निर्णय जाहीर केलेला नाही. ‘ऑनलाइन’ क्लासेस घेतले जातात; परंतु त्याबाबत अनेक अडचणी येत आहेत. आभासी पद्धतीच्या अध्यापनाचे आकलन नीट होत नाही. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत. दुसरीकडे, पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची चांगली समज आहे, असे असताना राज्य शासन महाविद्यालये बंद ठेवून काय साध्य करू इच्छिते, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.

चौकट.....

मदिरालये, मॉल उघडले; मग कॉलेजेस्‌ का नाही

अलीकडे शासनाने मदिरालये, मॉल उघडले. शाळा सुरू केल्या. मग, महाविद्यालये उघडण्यास काय अडचण आहे. बारावीनंतर पदवी प्रथम वर्ष ते पीएच.डी.पर्यंत शिक्षण बंद आहे. विद्यार्थी आपल्या भवितव्याबाबत चिंतेत आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेत महाविद्यालये व विद्यापीठातील अध्यापन तात्काळ सुरू केले पाहिजेत.

-निकेतन कोठारी, महानगरमंत्री, अ.भा.वि.प.

चौकट...

ज्यामुळे कोरोना भारतात आला, ती विमानसेवा सुरू केली. बाजारपेठा उघडल्या, शाळा सुरू केल्या. महाविद्यालयातील शिक्षण बंद का. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनाचा फायदा होत नाही. महाविद्यालये व विद्यापीठ लवकरात लवकर सुरू करावेत; अन्यथा आम्ही महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यांचे वर्ग घेऊ.

-लोकेश कांबळे, जिल्हाध्यक्ष, एसएफआय

चौकट...

जिल्ह्यात एकूण महाविद्यालये

१५३

एकूण विद्यार्थी संख्या

------

चौकट....

आम्ही मानसिक तणावाखाली

आमची मनापासून इच्छा आहे, महाविद्यालय आता उघडले पाहिजे. कारण एका वर्षापासून आम्ही घरी बसलेलो आहेत. खूप मानसिक तणावाखाली आम्ही वावरत आहोत. कुटुंबातील लोकही चिंतेत आहेत. आम्हाला भवितव्याबाबतची चिंता सतावत आहे.

-आकाश मारकळ (विद्यार्थी, विवेकानंद महाविद्यालय)

आता शासनाने निर्णय घेतला पाहिजे

तब्बल ११ महिन्यांपासून विद्यार्थी व महाविद्यालयाचा संपर्क तुटलेला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धत लाभदायक नाही. सद्य:स्थितीत जनजीवन पूर्वपदावर आले आहे, राज्य सरकारने तात्काळ प्रत्यक्षात महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार पुन्हा खुले करून द्यावे.

-आंबादास मेव्हणकर (विद्यार्थी)

Web Title: Schools in the district continue; Colleges only closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.