१५२९ शाळांमध्ये देणार ई-लर्निंग सुविधा
By Admin | Updated: May 19, 2015 00:46 IST2015-05-19T00:07:24+5:302015-05-19T00:46:03+5:30
जालना : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५२९ प्राथमिक आणि ३२ माध्यमिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा शासनाचा निधी, जि.प. उपकर आणि लोकसहभागातून आगामी दोन वर्षात देऊ,

१५२९ शाळांमध्ये देणार ई-लर्निंग सुविधा
जालना : जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १५२९ प्राथमिक आणि ३२ माध्यमिक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा शासनाचा निधी, जि.प. उपकर आणि लोकसहभागातून आगामी दोन वर्षात देऊ, असा विश्वास जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती ए.जे. बोराडे यांनी व्यक्त केला.
मानव विकास योजनेअंतर्गत ई-लर्निंग सुविधा प्रत्येक प्राथमिक शाळेत देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी ६५ हजार रुपये प्रत्येक शाळेसाठी खर्च केले जाणार आहेत. मात्र एवढ्या रक्कमेत या सुविधेचा संच उपलब्ध होत नाही. त्यामुळे आणखी ४० हजार रुपयांची गरज आहे.
ही रक्कम लोकसहभागातून उपलब्ध करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यात लोकांचाही सहभाग असावा, असे सभापती बोराडे म्हणाले.
ई-लर्निंग करीता मानव विकास मिशनच्या वतीने ४८.७५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. रोटरी क्लब आॅफ जालनाच्या वतीने सॉफ्टवेअरच्या खर्चाचा भार उचलण्यात येत आहे.
बहुतांश गावांनी लोकसहभागातून पूर्ण संच खरेदी केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने किनगाव, हरतखेडा, माळतोंडी, विडोळी, उज्जैनपुरी, भिलपुरी आदी शाळांचा सहभाग आहे. जिल्हा परिषदेच्या उपकरातूनही ५० लाख रुपयांची तरतूद ई-लर्निंग करीता उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे उन्हाळ्यातील पोषण आहार देणे सुरू आहे.
जून २०१५ पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात सर्वशिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थिनी, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार असल्याचे सभापती बोराडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१५ जून रोजी जिल्ह्यातील शाळा उघडणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जाणार आहेत. त्यासाठी शासनाकडून सर्वात प्रथम जालना जिल्ह्यास पुस्तके उपलब्ध झाली असून आतापर्र्यंत जिल्ह्यात ६५ टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे. यामध्ये जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ९० टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण झाल्याची माहिती सभापती बोराडे यांनी दिली. शाळेच्या पहिल्या दिवशी जि.प., पं.स. ग्रा.पं. सदस्य तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थिीत विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण केले जाणार असल्याचेही सभापती बोराडे यांनी सांगितले.