घरकुलाचे अनुदान लाटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:48 IST2017-09-11T00:48:17+5:302017-09-11T00:48:17+5:30
नगरपालिकेकडून राबविण्यात येणाºया रमाई घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

घरकुलाचे अनुदान लाटले !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नगरपालिकेकडून राबविण्यात येणाºया रमाई घरकुल आवास योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तब्बल १९ जणांनी अनुदानाचा ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता उचलून अद्यापही घरकुल बांधलेले नाही. या सर्वांना पालिकेकडून अभय मिळत आहे. त्यांच्यावर कारवाईस हात आखडता घेतला जात आहे.
सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने २ मार्च २०१० पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी ही योजना हक्काचे घर उभे करण्यासाठी फायद्याची आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी १ लाख रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी दीड लाख, महानगरपालिका क्षेत्रासाठी २ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाते.
बीड नगरपालिकेंतर्गतही ही योजना २०१२ पासून राबविली जात असल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. मागील ५ वर्षांत ५१७ घरकुल मंजूर झाल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले; परंतु यातील काही लाभार्थींनी बनावट पीटीआर, उत्पन्न, जातीचा दाखला आदी कागदपत्रे सादर करून लाभास पात्र असल्याचे सांगून पालिकेची दिशाभूल केली.
पालिका अधिकारी, कर्मचाºयांनीही याची शहानिशा न करता ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत त्यांना योजनेचा ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वितरित केल्याचे समोर आले. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.