सव्वाकोटी रुपये थकित
By Admin | Updated: July 20, 2014 00:32 IST2014-07-20T00:18:07+5:302014-07-20T00:32:52+5:30
विठ्ठल कटके , रेणापूर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़

सव्वाकोटी रुपये थकित
विठ्ठल कटके , रेणापूर
राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़ परंतु, यातील ९०० शेतकऱ्यांचे जवळपास सव्वाकोटी रूपयांचे अनुदान थकित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनुदानासाठी दररोज तालुका कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत़
केंद्र व राज्य शासनाकडून अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना आहे़ या योजनेअंतर्गत ठिबक व तुषार संचासाठी अल्पभुधारकांना ६० टक्के तर बहुभूधारकांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ रेणापूर तालुक्यातून सन २०१२-१३ या वर्षात ठिबक व तुषार संच खरेदीसाठी एकूण १ हजार २०५ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले़ त्यातील ९ प्रस्ताव कृषी खात्याने नाकारून १ हजार १९६ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरविले़ मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी १ लाख ते २ लाख रुपये स्वत: खर्च केला़ या प्रस्तावापैकी शासनाकडून २७४ शेतकऱ्यांना सन १०१२-१३ मध्ये ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़
त्यानंतर तालुका कृषी विभागाने ९२२ प्रस्तावांना पूर्वसंमती दिली. त्यांची तपासणी करून सर्व प्रस्ताव लातूरच्या उपविभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविले़ परंतु, या शेतकऱ्यांचे केंद्र शासनाचे एक कोटी दहा लाख व राज्य शासनाचे २८ लाख असे एकूण १ कोटी ३८ लाख रूपये अनुदान अद्याप मिळाले नाही़
अनुदान मिळावे म्हणून शेतकरी एक वर्षापासून तालुका कृषी कार्यालयाकडे खेटे घालत आहेत़ अनुदान मिळेल या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून बँकेकडून कर्ज काढून ठिबक व तुषार संच खरेदी करून त्याचा वापर सुरू केला़ परंतु, अनुदान रखडल्यामुळे हे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ हे अनुदान लवकर देण्याची मागणी होत आहे़
शेतकरी आर्थिक संकटात़़़
या योजनेअंतर्गत दोन एकरावर स्वत:चे ९० हजार रूपये खर्चून ठिबक संच बसविला़ सव्वा इंच बोअरच्या पाण्यावर बागायती शेती करण्याचे धाडस केले़ परंतु, निसर्गाची अवकृपा व शासनाकडून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याचे कामखेडा येथील दिगंबर गिरी या शेतकऱ्याने सांगितले़
सन २०१२-१३ वर्षात तालुक्यात या योजनेतंर्गत २७४ शेतकऱ्यांना ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़ उर्वरित ९२२ शेतकऱ्यांचे जवळपास १ कोटी ३८ लाख रूपयांचे अनुदान रखडले आहे़ शासनाकडून अनुदान मिळताच ते वाटप करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांनी सांगितले़