सव्वाकोटीचे रस्ते मंजूर
By Admin | Updated: February 13, 2015 00:46 IST2015-02-13T00:35:25+5:302015-02-13T00:46:55+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल सव्वाकोटीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युतपंप वाटपासह मंजुरी मिळाली.

सव्वाकोटीचे रस्ते मंजूर
उस्मानाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये तब्बल सव्वाकोटीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली. तसेच मागासवर्गीय शेतकऱ्यांना विद्युतपंप वाटपासह मंजुरी मिळाली.
जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, सभापती हरिष डावरे, बाबुराव राठोड, सदस्य प्रशांत चेडे, दत्ता साळुंके, मधुकर मोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तीन किमी अंतर असलेला दाऊतपूरला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. परिणामी या भागातील ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे सदरील रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत होती. त्यावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानुसार केंद्रिय तेराव्या वित्त आयोगातून या रस्त्यासाठी ३४ लाख ५० हजारांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
तसेच कवडेवाडी हा रस्तादेखील खराब झाला होता. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. याही रस्त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदरील साडेचार किमी रस्त्यावर ४५ लाख रूपये खर्च होणार आहेत. दरम्यान, उपळाई-सापनाई-सेलगाव या रस्त्याच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. खराब रस्त्यामुळे विशेषत: पावसाळ्यमध्ये ग्रामस्थ जेरीस येत होते. ही समस्या लक्षात घेवून जिल्हा परिषदेकडून ४० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय मान्यताही देण्यात आली.
हिप्परगा-हराळी-तावसी या रस्त्यासाठीही ४५ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांच्या जोखडातून ग्रामस्थांची सुटका होणार आहे. (प्रतिनिधी)
विद्युतपंपासाठी ४० लाख रुपये
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानावर विद्युतपंप वाटप करण्यात येते. या योजनेसाठी ४० लाखांची तरतूर करण्यात आली आहे. या खर्चालाही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्युतपंप खरेदीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
पाणी टंचाईवरही चर्चा
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये पाणीटंचाईवरही चर्चा करण्यात आली. सध्या १२ टँकर आणि १९४ अधिग्रहणांच्या माध्यमातून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. ही टंचाई भविष्यात आणखी तीव्र रूप धारण करणार असल्याने पाणी योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांनी यांनी दिले.