मागील वर्षीच्या वह्यांवर मानावे लागेल समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:02 IST2021-05-28T04:02:02+5:302021-05-28T04:02:02+5:30
औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणामुळे वह्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जेथे एक विद्यार्थी १ ते २ डझन वह्या ...

मागील वर्षीच्या वह्यांवर मानावे लागेल समाधान
औरंगाबाद : ऑनलाइन शिक्षणामुळे वह्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. जेथे एक विद्यार्थी १ ते २ डझन वह्या खरेदी करत असे, तेथे मागील शैक्षणिक वर्षात केवळ ३ ते ४ वह्यांवर काम भागविण्यात आले. यंदाही हीच परिस्थिती राहणार असल्याने स्टेशनरी विक्रेत्यांनी नवीन वह्या मागविण्याचे धाडस केले नाही.
कोरोनामुळे देशाचे सर्वात जास्त शैक्षणिक झाले आहे. आरोग्यानंतर शिक्षणाचा नंबर लागतो. मागील वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे वाया गेले. यंदा जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार होती; पण आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे भाकीत सरकारने केले आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका आहे. त्यामुळे जून महिन्यात शाळा सुरू होतील की, नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून काही सूचना आल्या नसल्याने ‘थांबा व वाट पहा,’ असे धोरण शाळा व्यवस्थापनाने अवलंबले आहे. शाळा सुरू होतील की नाही यासंदर्भात अनिश्चतता आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू होईल; पण मागील वर्षी जिल्ह्यात २७ कोटींपैकी केवळ ५ कोटींच्या वह्या विकल्या गेल्या होत्या. सुमारे २२ कोटी रुपयांच्या वह्या शिल्लक आहेत. वह्यांचे वितरक अविनाश फरसुले यांनी सांगितले की, जिल्ह्यात ९ लाख विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी १ डझन वह्या खरेदी करत असे, आता ऑनलाइन शिक्षणामुळे अनेकांनी दोन ते तीन वह्या खरेदी केल्या होत्या. एकच वही रफ म्हणून सर्व विषयासाठी वापरली जात होती. कारण, बहुतांश शाळांनी वह्या तपासल्या नाहीत. पुढील महिन्यात शाळा सुरू होणार आहेत; पण अजूनही वह्यांची यादी शाळांनी पाठवली नाही. यामुळे वितरकांनी मुंबई, अहमदाबाद येथील उत्पादकांना नवीन ऑर्डर दिल्या नाहीत. बहुतांश वितरक मागील वर्षीच्या शिल्लक वह्या विक्री करून अडकलेली मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
चौकट
एकमेकांना दिली जुनी पुस्तके
मागील वर्षी लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. पालकांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले व आपल्या पाल्याची मागील वर्षीची पुस्तके दुसऱ्या पाल्यांना दिली. ३० ते ४० टक्के पालकांनी एकमेकांना पुस्तकांची अदलाबदल केली. तसेच पुस्तकाचे ऑनलाइन पीडीएफ उपलब्ध झाल्याने मागील वर्षी पुस्तकाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला, असे वितरकांनी नमूद केले.
चौकट
स्टेशनरीची १०० लहान दुकाने बंद
स्टेशनरी वितरकांनी सांगितले की, जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे ३ हजार स्टेशनरी दुकानदार आहेत. त्यातील शहरात ८०० च्या जवळपास दुकाने आहेत. जी दुकाने भाड्याने होती, अशा १०० हून अधिक दुकानदारांनी दुकाने खाली केली आहेत. कारण स्टेशनरी दुकानदारांचा मुख्य हंगाम मे ते जुलै हे तीन महिनेच असतो.