महापालिका निवडणुकीनंतरच वाळूज हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:04 IST2021-09-23T04:04:46+5:302021-09-23T04:04:46+5:30

बैठकीतील ठळक वैशिष्ट्ये सिडकोच्या तिन्ही प्रकल्पात देखभाल दुरूस्ती मनपा प्रशासन करणार. सिडकोने मनपाला डेव्हलपमेंट चार्जेस द्यावेत. नवीन रेखांकन, बांधकाम ...

Sand transfer only after municipal elections | महापालिका निवडणुकीनंतरच वाळूज हस्तांतरण

महापालिका निवडणुकीनंतरच वाळूज हस्तांतरण

बैठकीतील ठळक वैशिष्ट्ये

सिडकोच्या तिन्ही प्रकल्पात देखभाल दुरूस्ती मनपा प्रशासन करणार.

सिडकोने मनपाला डेव्हलपमेंट चार्जेस द्यावेत.

नवीन रेखांकन, बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे.

५ हजार पथदिवे राखीव ठेवण्याचे निर्देश

नवीन पाणीपुरवठा योजनेत वाळूजचा समावेश

ड्रेनेजलाईन कांचनवाडी एसटीपी प्लांटशी जोडणार

औरंगाबाद : वाळूज परिसरातील सिडकोचे तीन मोठे प्रकल्प महापालिका हद्दीत घेण्यासाठी अलीकडेच मनपा प्रशासनाने १४ अधिकाऱ्यांची समिती गठीत केली. आता या प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून, बुधवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि सिडको प्रशासक दीपा मुधोळ- मुंढे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली. हस्तांतरित भागात मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बुधवारी वाळूज मधील सिडको महानगर १, २ आणि ४ हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आणि ड्रेनेज या सुविधा सद्यस्थिती बद्दल किती आहेत, यावरच सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय विकास कामे आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असेल तर त्याचा अंदाज काढून सिडकोने मनपाला डेव्हलपमेंट चार्जेस द्यावेत यावर सहमती दर्शविण्यात आली. सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या नागरी सुविधा रस्ते, ड्रेनेज लाईन आणि पथदिवे याची देखभाल दुरुस्ती महानगरपालिका करील. याच प्रमाणे यापुढे नवीन रेखांकन आणि बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिकेकडे असतील. यावेळी मनपा प्रशासक पांडेय यांनी वाळूज महानगर येथील देखभाल दुरुस्ती व इतर विकास कामासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ५० कोटी रुपयांची तरतूद ठेवण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली. या भागासाठी ५ हजार पथदिवे राखीव ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. वाळूज येथील नागरिकांना भविष्यात पिण्याचे पाणीही लागेल. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत वाळूजचा समावेश करता येईल असेही प्रशासक पाण्डेय यांनी नमूद केले. वाळूज महानगरची ड्रेनेज लाईन कांचनवाडी एसटीपी प्लांटशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, उपायुक्त अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, ए. बी. देशमुख, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे व इतर सिडकोचे अधिकारी यांची उपस्थित होते.

Web Title: Sand transfer only after municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.