एसटीत विक्रेत्यांची ‘घुस’खोरी
By Admin | Updated: May 21, 2016 00:19 IST2016-05-21T00:18:27+5:302016-05-21T00:19:42+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद ‘चना, कुरकुरे, गरमागरम चाय, भजे, भेळ, पाणी बॉटलवाले’ म्हणत थेट बसमध्येच फेरीवाल्यांची घुसखोरी वाढल्याने प्रवासीदेखील त्रस्त आहेत.

एसटीत विक्रेत्यांची ‘घुस’खोरी
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
‘चना, कुरकुरे, गरमागरम चाय, भजे, भेळ, पाणी बॉटलवाले’ म्हणत थेट बसमध्येच फेरीवाल्यांची घुसखोरी वाढल्याने प्रवासीदेखील त्रस्त आहेत. महाव्यवस्थापकांनी ताकीद देऊनही नियम धाब्यावर बसवून हा धंदा राजरोसपणे सुरू आहे.
फेरीवाल्यांच्या बसमधील चढ-उतारामुळे प्रवाशांना अडचणी येतात. तरीही फेरीवाले कुणालाही जुमानत नसल्याचे दिसते. बसमध्ये घुसखोरी करून विविध वस्तूंची विक्री केली जाते. कुणी खरेदी केली अथवा नाही तरीही गोंगाटाच्या वातावरणात प्रवाशांना डोकेदुखीचा त्रास मात्र हमखास सहन करावाच लागतो.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने कुटुंबियांसह अनेकांचे पर्यटन सुरू असल्याचा फायदा फेरीवाले उचलत आहेत. फेरीवाले २४ तास बसस्थानकावर फिरताना दिसत आहेत. चालक व वाहकांनीच फेरीवाल्यांना बसमध्ये येऊ देऊ नये; अन्यथा त्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे आदेशित केलेले आहे.
काही कर्मचारी या घुसखोरांना रोखण्यासाठी नियुक्त केले असले तरी एका स्टॉलचालकाने किमान दहा ते पंधरा मुलांना अस्थायी काम दिले असून, वरकमाई जोरात करण्यासाठी फेरीवाल्यांचा नुसता गोंगाट सुरू असतो. विवाह समारंभ व मामाच्या गावाला जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असून, उन्हाचा चढता पारा अन् उकाडा वाढल्याने प्रवाशांना काही वस्तूंची खरेदी करावीच लागते; परंतु बसमध्ये फेरीवाल्यांना येण्यास मज्जाव असतानाही ते सरळ बसमध्ये घुसून आरोळ्या मारतात. अशा प्रसंगी काही नको; पण ‘आवाज आवर’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर येते. त्यामुळे अनेकदा किरकोळ वादही होतात. बसस्थानकात फेरीवाले नियमाचे कसे उल्लंघन करतात, त्याचे सदर प्रतिनिधीने स्टिंग आॅपरेशन करून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.