मुद्रांकाची जादा दराने विक्री
By Admin | Updated: June 22, 2014 00:24 IST2014-06-22T00:15:48+5:302014-06-22T00:24:40+5:30
सेलू: शहरात मुद्रांक विक्रेते चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने दुय्यम निबंधकास घेराव घालून आंदोलन करण्यात आले़

मुद्रांकाची जादा दराने विक्री
सेलू: शहरात मुद्रांक विक्रेते चढ्या भावाने विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने दुय्यम निबंधकास घेराव घालून आंदोलन करण्यात आले़ पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना विविध कागदपत्राची पूर्तता करावी लागते. त्यातच १०० रूपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता असते परंतू शहरातील काही मुद्रांक विक्रेते १०० रूपयांचा मुद्रांक १२० रूपयांना विक्री करून जनतेची लूट करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत होती़ संभाजी ब्रिगेडच्या वतीने या प्रकरणी दुय्यम निबंधकास जाब विचारून चढ्या भावाने विक्री करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली़ संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक पवित्र्यानंतर दुय्यम निबंधक गडप्पा यांनी जादा दराने विक्री करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्याचे रजिस्टर व इतर साहित्य जप्त करून पंचनामा केला़ काही मुद्रांक विक्रेते दुसऱ्याच्या नावाचा परवाना वापरून मुद्रांक विक्री करत आहेत़ सध्या शेतकरी व विद्यार्थ्यांना विविध कागदपत्र काढण्यासाठी मुद्रांकांची आवश्यकता भासते़ परंतू काही मुद्रांक विक्रेते चढ्या भावाने विक्री करू लागले आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडने दुय्यम निबंधक गडाप्पा यांना घेराव घालून ८ दिवसात कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, कारवाई न झाल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा संभाजी ब्रिगेड केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छगन शेरे, बजरंग आरकुले, रणजित चव्हाण, रामेश्वर शेरे, महेश मुसळे, विक्रांत पाटील, ऋषी चट्टे, अॅड़ उमेश काष्टे, अमोल शेवाळे, भागवत मगर, निलेश शिंदे, कृष्णा रोडगे, निशिकांत रोडगे, राहूल निर्वळ, विजय शेवाळे, संतोष शिंदे यांनी दिला आहे़ (प्रतिनिधी)