आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी दिले वेतन
By Admin | Updated: February 13, 2015 00:47 IST2015-02-13T00:45:22+5:302015-02-13T00:47:45+5:30
लातूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने बळीराजा सबलीकरण योजना राबविण्यात येत असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना या योजनेतून मदत केली जाणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी दिले वेतन
लातूर : जिल्हा प्रशासनाच्या वतीने बळीराजा सबलीकरण योजना राबविण्यात येत असून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना या योजनेतून मदत केली जाणार आहे. जिल्हा परिषदेतील वर्ग-१ पासून चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. २ कोटी ८९ लाख ४ हजार ७०० रुपयांचा निधी यातून मिळणार असून, आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ही सामाजिक बांधिलकी दाखविली आहे.
लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, यासाठी बळीराजा सबलीकरण योजना सुरु करण्यात आली आहे. विविध सामजिक संस्था-संघटनांच्या वतीने शेतकऱ्यांचे समुपदेशनही करण्यात येत आहे. नुकतीच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. आता जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सबलीकरण योजनेला एक दिवसाचा पगार देऊ केला आहे. जिल्हा परिषदेतील सेवकांसह वर्ग-१ चे अधिकारी एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी देणार आहेत. यातून २ कोटी ८९ लाख ४ हजार ७०० रुपयांचा निधी सबलीकरणाला मिळणार आहे. मिळालेल्या निधीतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही सावरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच अन्य कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी काही योजना सबलीकरणातून राबविण्यात येणार आहेत.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, विवाह यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. जिल्हा परिषदेतील वर्ग-१ चे अधिकारी फेब्रुवारीच्या पगारातील तीन दिवसाचे वेतन देणार आहेत़ वर्ग-१ चे १८० कर्मचारी आहेत. त्यांच्या या वेतनातून ८ लाख १० हजार रूपये जमा होतील़ वर्ग-२ चे ५३ अधिकारी आहेत. ते दोन दिवसांचे वेतन देणार आहेत. यातून १ लाख ६ हजार रूपये जमा होतील. वर्ग-३ चे ८५४१ कर्मचारी आहेत. ते एक दिवसाचे वेतन या उपक्रमाला देणार आहेत. त्यातून ५९ लाख ७८ हजार ७०० रुपये जमा होतील. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक, खाजगी व जिल्हा परिषद शाळेचे सुमारे २० हजार शिक्षक, कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून एक दिवसाचे वेतन मिळणार आहे. यातून १ कोटी ४० लाख रूपयांचा निधी जमा होणार आहे. हा सर्व निधी सुमारे २ कोटी ८९ लाख ४ हजार ७०० रुपयांचा होईल. त्यातून सबलीकरण योजना राबवून एक वेगळा सामाजिक बांधिलकीचा पॅटर्न पुढे येणार आहे.
दरम्यान, या संदर्भात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जि.प.चे मुख्य कार्यकरी अधिकारी दिनकर जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे, पशुसंवर्धन विभागातील संतोष माने, शिक्षक संघटनेचे लायक पटेल, बळवंत कदम, एस़ आऱ देशमुख, एम़बी़ शेळके, एलक़े़ धुमाळ, एऩ एम़ बेग, व्ही़एम़ वाकुरे, सुनिल हाके, राजपाल पाटील, विमल लोखंडे, जे़पी़ कादरी, एम़आऱधुमाळ, माधव गुंडरे, दिपक कांबळे, बी़आऱ सातपुते, पुष्पा जाधव, उषा मिसर, कालिदास माने, भारत सातपूते आदींची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून फेब्रुवारी महिन्यातील वेतन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटना तसेच शिक्षक संघटनांनीही या निर्णयाला सहमती दर्शविली आहे. त्यांच्या वेतनातून २ कोटी ८९ लाख ४ हजार ७०० रुपये मिळणार आहेत.
४फेब्रुवारीतील वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्या झाल्या सबलीकरण योजनेला त्यातील एक दिवसाचा पगार दिला जाणार आहे. सेवकांपासून वर्ग-१ चे अधिकारी एक, दोन, तीन दिवसांचे वेतन देणार आहेत. या रकमेतून ‘शेतकरी सबलीकरण’ उपक्रम राबविला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.