आत्मा जागृतीसाठी साधना करावी
By Admin | Updated: June 10, 2016 00:04 IST2016-06-10T00:03:13+5:302016-06-10T00:04:53+5:30
औरंगाबाद : भगवंतासमोर बसून त्याची आराधना करणे, पूजा करणे याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.

आत्मा जागृतीसाठी साधना करावी
औरंगाबाद : भगवंतासमोर बसून त्याची आराधना करणे, पूजा करणे याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा. भगवंतांनी दाखविलेला मार्ग अनुसरण्याकरिता, आपला आत्मा जागृत करण्यासाठीच ती साधना असते. समग्र ज्ञान प्राप्तीसाठीच ती उपासना असते. आत्मा हा सर्वशक्तिमान आहे आणि त्याच माध्यमातून आपण स्वर्ग, मोक्षाची प्राप्ती करवून घेऊ शकतो, असे प्रतिपादन आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी येथे केले.
आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट तसेच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित अभय महामहोत्सवात आचार्यश्री भाविकांना मार्गदर्शन करीत होते. प्रवचनानंतर जोहरीवाडा येथील गोडीजी जैन मंदिर येथे गोडीजी पार्श्वनाथ भगवंतांच्या मूर्तीवर शांतीधारा अभिषेक करण्यात आला.
सलग अडीच तास विविध औषधीयुक्त जलाचा अभिषेक करण्यात आला. शुक्रवारी १० रोजी आचार्य भगवंतांच्या आचार्यपदाच्या ३२ व्या प्रवेशानिमित्त आणि पंन्यास मोक्षरत्नजी यांच्या पंन्यासपदानिमित्त सकल जैन महिला मंडळातर्फे कुंभारवाडा येथे दुपारी २ वाजता मंगल गीत, भक्तिनाटिका, नृत्यनाटिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरू राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी सकल जैन समाजाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे व खताचे वाटप करण्यात येणार आहे. पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे सकाळी ९ वाजता आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी यांच्या हस्ते शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचे वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी आचार्यश्रींचे ‘महावीर के पथ पर -मानवता के प्रकाश मे’ या विषयावर प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुष्काळ निवारण तसेच भरपूर पर्जन्यवृष्टीकरिता जप अनुष्ठान करण्यात येणार आहे.