पाण्यासाठी धावपळ; पुन्हा विजेचे शटडाऊन
By Admin | Updated: June 7, 2014 00:42 IST2014-06-07T00:42:18+5:302014-06-07T00:42:18+5:30
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना आज पाण्यासाठी धावपळ करावी लागली.

पाण्यासाठी धावपळ; पुन्हा विजेचे शटडाऊन
औरंगाबाद : शहरातील नागरिकांना आज पाण्यासाठी धावपळ करावी लागली. महावितरण कंपनीकडून ६ जून रोजी तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उद्या ७ जून रोजी काही भागांमध्ये कमी दाबाने, तर कुठे निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेतही आज पाण्याचा ठणठणाट होता. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात खाजगी कंपन्यांकडून पाणी मागविण्यात आले.
उपअभियंता यू. जी. शिरसाठ यांनी सांगितले की, आज तीन वेळा ट्रीपिंग झाल्यामुळे ७ जून रोजी पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. दरम्यान, नवनियुक्त सभापती विजय वाघचौरे आणि आ. प्रदीप जैस्वाल, नगरसेवक कृष्णा बनकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर खा.चंद्रकांत खैरे यांनीदेखील सर्व अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा लवकर सुरळीत करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता वसंत निकम यांची उपस्थिती होती.
महावितरणची बैठक
८ जून रोजी सायंकाळी ४ वा. महावितरण कंपनी व मनपाची संयुक्त बैठक सुभेदारी विश्रामगृहावर होणार आहे. त्या बैठकीत कंपनीने वीजपुरवठा उद्योगांकडे का वळविला. मनपासाठी काय उपाययोजना केल्या, यावर चर्चा होेईल, असे खा.खैरे यांनी सांगितले.
मेपासून खंडित झालेला वीजपुरवठा..
१ मे क्रांतीचौक पंपिंग हाऊस १० मिनिटे, २ मे नक्षत्रवाडी ५ मिनिटे, ४ व ५ मे ढोरकीन पंप हाऊस ५ मिनिटे, १४ मे नक्षत्रवाडी २० मिनिटे, २१ मे ढोरकीन १५ मिनिटे, तर नक्षत्रवाडी १० मिनिटे, २२ मे जायकवाडी पंप हाऊस ४० मिनिटे, जायकवाडी नवीन योजना ४० मिनिटे, फारोळा ट्रीपिंग, ढोरकीन ५ मिनिटे, तर नक्षत्रवाडी ५ मिनिटे, २३ मे फारोळा पंप हाऊस ४० मिनिटे, नक्षत्रवाडी १० मिनिटे, २६ मे जायकवाडी जुने ४५ मिनिटे, जायकवाडी नवीन पंप हाऊस ३० मिनिटे, ३० व ३१ मे फारोळा ट्रीपिंग, ढोरकीन २ तास १० मिनिटे, १ जून ढोरकीन ५ मिनिटे, नक्षत्रवाडी १० मिनिटे, २ जून जायकवाडी नवीन ५ मिनिटे, ढोरकीन ४ तास, ३ जून जायकवाडी जुने साडेतीन तास, नवीन साडेचार तास, फारोळा ट्रीपिंग, ढोरकीन ९ तास, ४ जून जायकवाडी जुने पंप हाऊस सव्वापाच तास, नवीन हाऊस साडेपाच तास, ६ जून फारोळा येथे ट्रीपिंग झाल्याचे उपमहापौर संजय जोशी यांनी सांगितले.
पाणी आहे; वाटप योग्य नाही
हर्सूल आणि जायकवाडी धरणात मुबलक पाणी आहे. मात्र, त्याचे योग्य रीतीने वाटप होत नाही, असा आरोप करीत खा.चंद्रकांत खैरे यांनी पालिकेला घरचा अहेर दिला. शहर पाणीपुरवठ्यास अधिकारी जबाबदार असल्याचे खापरही त्यांनी फोडले.
पाणीपुरवठ्याचे राजकारण करून काही जण मनपाच्या निवडणुकीला आतापासूनच लागले आहेत. त्यांना मोर्चा काढण्याची संधी अधिकारी देत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी महापौर कला ओझा, आ. प्रदीप जैस्वाल यांची उपस्थिती होती.