ग्रामीण डाकसेवा विस्कळीत
By Admin | Updated: March 16, 2015 00:51 IST2015-03-16T00:43:36+5:302015-03-16T00:51:18+5:30
लातूर : ग्रामीण भागातील डाक कर्मचारी संपावर असल्याने पोस्टाची सेवा विस्कळीत झाली आहे. संपाचा सहावा दिवस असून,

ग्रामीण डाकसेवा विस्कळीत
लातूर : ग्रामीण भागातील डाक कर्मचारी संपावर असल्याने पोस्टाची सेवा विस्कळीत झाली आहे. संपाचा सहावा दिवस असून, अद्याप शासनाने या ग्रामीण कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला नाही. उलट नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हास्तरावरील अधिकारी दमदाटी करून संप हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांनी या दमदाटीला बळी न पडता संप सुरूच ठेवला आहे.
लातूर जिल्ह्यात ग्रामीण डाकसेवेतील ३४० कर्मचारी संपावर आहेत. यात काही नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नियमाने तीन तासांची सेवा असताना या कर्मचाऱ्यांना आठ-नऊ तास राबविले जाते. राबण्यासही या कर्मचाऱ्यांची काहीच हरकत नाही. परंतु, कामानुसार वेतन दिले जात नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांची आहे. सातवा वेतन आयोग नाही. पेन्शन योजना नाही. ग्रॅच्युईटी नाही की भविष्यनिर्वाह भत्ता नाही. या सर्व बाबी ग्रामीण डाक सेवेतील कर्मचाऱ्यांना लागू कराव्यात.
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींची समिती स्थापून या समितीमार्फत ग्रामीण डाक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय खातेबाह्य टपाल कर्मचारी संघटनेने केली आहे. परंतु, संपाचा सहावा दिवस उलटूनही अद्याप शासनासोबत बोलणी झालेली नाही. त्यामुळे संप सुरूच आहे. जोपर्यंत मागण्यांचा विचार केला जात नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे अ.भा. खातेबाह्य टपाल कर्मचारी संघटनेने म्हटले आहे. लातूरचा संप संघटनेचे सचिव गंगाधर हिंगमिरे, उपाध्यक्ष बी.एस. गाडे, सहसचिव बी.एम. शिंदे, सहखजिनदार पी.एम. सूर्यवंशी, उपाध्यक्ष एन.जी. कदम आणि संघटक सचिव आर.एम. जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. (प्रतिनिधी)