लोकमत महामॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज; आज बिब एक्स्पो सोहळ्यात रनर किट होणार प्रदान

By जयंत कुलकर्णी | Published: December 16, 2023 11:36 AM2023-12-16T11:36:34+5:302023-12-16T11:37:58+5:30

१७ डिसेंबरला होणाऱ्या महामॅरेथॉनच्या मार्गावर विविध शाळांतील विद्यार्थी धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करणार आहेत.

Runners ready for Lokmat Mahamarathon, bib expo ceremony today | लोकमत महामॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज; आज बिब एक्स्पो सोहळ्यात रनर किट होणार प्रदान

लोकमत महामॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज; आज बिब एक्स्पो सोहळ्यात रनर किट होणार प्रदान

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर राज्यभरातील नागरिक, धावपटू विभागीय क्रीडा संकुलावर १७ डिसेंबरला रंगणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी सज्ज झाले आहेत. रविवारी होणारी महामॅरेथॉन संस्मरणीय करण्यासाठी व या उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व धावपटू आतूर झाले आहेत. या महामॅरेथॉननिमित्त शनिवारी (दि. १६) लोकमत समूहातर्फे बिब एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत भवन येथील हॉलमध्ये या एक्स्पोला शनिवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. सकाळी या सोहळ्याचे उद्घाटन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ७ वाजल्यादरम्यान होणाऱ्या बिब एक्स्पो सोहळ्यादरम्यान लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना रनर किट दिले जाणार आहे. त्यामुळे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजण्यादरम्यान मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्व नागरिक, धावपटूंनी बिब एक्स्पोला येताना शुल्क भरल्याची पावती दाखवून आपला रनर किट घेऊन जावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

बिब एस्पोदरम्यान मान्यवरांचे होणार सेशन
या बिब एक्स्पो सोहळ्यात शनिवारी अनेक मान्यवरांचे सेशन सहभागी धावपटूंसाठी ठेवण्यात आले आहे. त्यात दुपारी १ वाजता डॉ. अक्षय मारावार यांचे ‘स्पोर्टस् इंज्युरीज इन मॅरेथॉन’ या विषयावर सेशन होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता डॉ. प्रशांत पारधे यांचेही मोफत मॅन्युअल थेरपी सेशन महत्त्वाचे असणार आहे. या सेशनमध्ये पारधे हे उपस्थितांना चालण्याची पद्धत व वेदनादायक सांध्याची स्थिती सुधारण्यास मदत होण्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३ वाजता सिग्मा हॉस्पिटलच्या डॉ. शलाका पाटील यांच्या ‘धावपटूंसाठी आहार’ या विषयावर सेशन होणार आहे.

दरम्यान, १७ डिसेंबरला होणाऱ्या महामॅरेथॉनच्या मार्गावर विविध शाळांतील विद्यार्थी धावणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. महामॅरेथॉनच्या मार्गादरम्यान १८ शाळांतील विद्यार्थी लेझीम, ढोल, नृत्य, झुम्बा डान्स, फ्लॅग ड्रिल, पोम पोम ड्रिल, संगीत आणि गाण्याद्वारे नागरिक धावपटूंना प्रोत्साहित करणार आहेत.

Web Title: Runners ready for Lokmat Mahamarathon, bib expo ceremony today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.