गुलाबाचे फूल, पुस्तके अन् मिठाई...

By Admin | Updated: June 17, 2014 01:06 IST2014-06-17T01:00:59+5:302014-06-17T01:06:56+5:30

औरंगाबाद : सडा, रांगोळ्या काढून, आंब्यांची पानं व हार तोरणांनी सजलेल्या शाळेच्या प्रांगणात पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या चिमुरड्यांचे गुलाबाची फुलं देऊन स्वागत...

Rose flowers, books and sweets ... | गुलाबाचे फूल, पुस्तके अन् मिठाई...

गुलाबाचे फूल, पुस्तके अन् मिठाई...

औरंगाबाद : सडा, रांगोळ्या काढून, आंब्यांची पानं व हार तोरणांनी सजलेल्या शाळेच्या प्रांगणात पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या चिमुरड्यांचे गुलाबाची फुलं देऊन स्वागत... त्यांची गावातून वाजतगाजत काढण्यात आलेली प्रवेश दिंडी... मिरवणूक व पाठ्यपुस्तकांचे वाटप आणि प्रत्यक्ष शिकविण्यास सुरुवातही... दुपारी गोड जेवण... अशा मंगलमय वातावरणात मुलांच्या कलकलाटाने सोमवारी शाळा गजबजून गेल्या.
जिल्हा परिषद, महापालिकांच्या शाळांमधून प्रवेशोत्सवाचा जल्लोष होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यासाठी शिक्षण विभागाने नियोजनबद्ध तयारी केली होती. सोमवारी सकाळीच शाळेच्या प्रांगणात सडा, रांगोळ्या काढून आंब्यांची पाने व फुलांची तोरणे लावण्यात आली होती. पहिल्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या नवागतांच्या हाती गुलाबाची फुले देऊन स्मित हास्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभीच गावातून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक व प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेचा पहिला दिवस हा पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन परिषद व गावातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत स्वागत समारंभ आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण मुलांना करण्यात आले.
सकाळी १० वाजता नियमित अध्यायनास सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहारात मुलांना गोडभात, सोनपापडीसारखे मेनू होते. पहिल्याच दिवशी शाळा पूर्णवेळ अध्ययन व अध्यापन करून चालविण्यात आली.
गणवेशाला अवकाश
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पहिल्याच दिवशी देण्यात आली असली तरी गणवेशासाठी १५ आॅगस्टपर्यंत त्यांना वाट पाहवी लागणार आहे.
यंदा कोणत्याही परिस्थितीत रेडिमेड गणवेश द्यायचे नाहीत, असा दंडक शिक्षण विभागाने घातला आहे. त्यामुळे गणवेश शिवून घेण्यास वेळ लागणार आहे.
आर्थिकदृष्ट्या मागास, एससी व एसटी प्रवर्गातील मुलांना दोन गणवेश दिले जाणार आहेत. गणवेशासाठीचा निधी प्रत्येक शाळांना वितरितही करण्यात आला आहे; परंतु शाळा व्यवस्थापन समितीच्या तांत्रिक मान्यतेअभावी हा निधी अद्याप खर्च करता आलेला नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली. पाठ्यपुस्तकांचे मात्र, ९५ टक्के वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rose flowers, books and sweets ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.