जिल्ह्यात रोहिण्या बरसल्या
By Admin | Updated: June 4, 2014 01:34 IST2014-06-04T01:20:34+5:302014-06-04T01:34:44+5:30
पैठण : रोहिणी नक्षत्राच्या पावसाचे पैठण तालुक्यात जोरदार वादळासह आगमन झाले.

जिल्ह्यात रोहिण्या बरसल्या
पैठण : रोहिणी नक्षत्राच्या पावसाचे पैठण तालुक्यात जोरदार वादळासह आगमन झाले. तुफानासह झालेल्या या वादळाने तालुक्यातील शेकडो महाकाय वृक्ष उन्मळून पडले, तर तालुकाभर हजारो नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेली. तालुक्यातील वरवंडी तांडा येथे घराची भिंत अंगावर पडून रुख्मणबाई शांतीलाल चव्हाण (४५) या महिलेचा मृत्यू झाला. या वादळाने शेतातील फळपिकांना पुन्हा एकदा तडाखा बसला आहे. ठिकठिकाणी वृक्ष पडल्याने औरंगाबाद-पैठण, पैठण-शहागड व पैठण-पाचोड रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक खोळंबली होती. आज दुपारनंतर तालुकाभर पावसास प्रारंभ झाला. या पावसासोबतच वादळाचे आगमन झाले. या वादळाने बिडकीन ते पैठणदरम्यान पैठण-औरंगाबाद रोडवर अनेक वृक्ष उन्मळून पडले. या वादळासोबत वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या (शाखा) पालापाचोळ्यासारख्या उडत होत्या. शेतावर कामासाठी गेलेल्या शेतकर्यांना, शेतमजुरांना व रोडवरील वाहनांना या फांद्यांपासून बचाव करून स्वत:चे संरक्षण करावे लागले. ढोरकीन येथे अनेक घरांची पडझड झाली. यात बकर्या, छोटी जनावरे दगावली. वादळाचा सर्वाधिक फटका पैठण, ढोरकीन, बिडकीन, कौटगाव, पिंपळवाडी, बालानगर, दावरवाडी, मुधलवाडी, रहाटगाव, भोपेवाडी, पाटेगाव, ढाकेफळ या परिसराला बसला. बालानगर परिसरातील २५ नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाल्याची माहिती आमचे वार्ताहर संजय दिलवाले यांनी दिली. दावरवाडी, गोपेवाडी परिसरातील सुनील कुलकर्णी, जगदीश कुलकर्णी यांच्या शेतवस्तीतील घरांची पत्रे उडून गेले. बालानगर, टाकळी, पैठण परिसरात वादळासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे परिसरातील डाळिंब व मोसंबीची फळे गळून पडली. वारंवार होणारी गारपीट, वादळवार्याने शेतकरी खचले आहेत. या पावसाने डाळिंबाचे मोठे नुकसान झाल्याचे माणिक खराद यांनी सांगितले. पाचोडमध्ये मशागतीला वेग पाचोड : मंगळवारी पाचोडला वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे रोहिण्या थोडाफार का होईना बसरल्यामुळे शेतीच्या मशागतीला आता वेग येणार आहे. लोणी खुर्द परिसरात मोठे नुकसान लोणी खुर्द : परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वार्यासह सुमारे तासभर पाऊस झाला. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यामुळे धान्य व संसारोपयोगी वस्तू नष्ट झाल्या. कांद्याच्या चाळींचे छत उडून त्यात साठविलेले कांदे संपूर्ण ओले होऊन ते फेकून देण्याची वेळ आलेली आहे. ज्ञानेश्वर प्रल्हाद जाधव यांनी सहा महिन्यांपूर्वी बँकेचे कर्ज घेऊन उभे केलेले शेड-नेट जमीन उद्ध्वस्त झाले. मागील गारपिटीतही त्यांचे सिमला मिरचीचे नुकसान झालेले होते. वाकला येथील जगन्नाथ रामजी सोनवणे यांचे ही शेड-नेट वादळामुळे उडून गेले. वीजही गुल आहे. मोबाईलचे नेटवर्कही नाही. ढोरकीनच्या बाजाराला फटका जायकवाडी : परिसरात मंगळवारी दुपारी अनेक गावांत घरावरील पत्रे उडाले. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसात गारपीटही झाली. याचा सर्वांत जास्त फटका ढोरकीनच्या आठवडी बाजाराला बसला. जायकवाडी येथे संजयनगरमधील दोन जणांची घरे पडली. यामध्ये घराच्या भिंती अंगावर पडून राधाबाई वसंत जगधने (४५) यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली, तर दगडू जगधने यांच्या पायाला मार लागला. जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सवंदगावात पत्रे उडाले सवंदगाव : येथे सोमवारी रात्री वादळी वार्यासह झालेल्या पावसाने अनेक घरांवरील पत्रे उडाले. त्यात सोमीनाथ निकम, अण्णा झारे, भीमराज धुळे, बाबासाहेब म्हस्के यांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. याशिवाय वृक्ष उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. पिंप्रीराजा येथेही वादळी पावसासह पाच मिनीटे बारीक गारा पडल्या. (वार्ताहर)