गोडे तेलाच्या टाक्या चोरणारी टोळी जेरबंद
By Admin | Updated: February 14, 2015 00:11 IST2015-02-13T23:56:59+5:302015-02-14T00:11:59+5:30
खुलताबाद : गोडे तेलाच्या टाक्या चोरणाऱ्या टोळीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पकडण्यात यश मिळाले

गोडे तेलाच्या टाक्या चोरणारी टोळी जेरबंद
खुलताबाद : तालुक्यातील गल्लेबोरगाव, तसेच सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथील किराणा दुकानासमोर ठेवलेल्या गोडे तेलाच्या टाक्या चोरणाऱ्या टोळीतील एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पकडण्यात यश मिळाले असून त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीच्या ७ टाक्या जप्त केल्या आहेत.
याबाबत औरंगाबाद ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील खुलताबाद-अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यापाऱ्यांच्या किराणा दुकानासमोरून जून २०१४ मध्ये गोडे तेलाच्या टाक्या चोरीस गेल्या होत्या. त्यावरून फिर्यादी रामदास शेषराव चंद्रटिके, रा. गल्लेबोरगाव, ता. खुलताबाद यांच्या गल्लेबोरगाव येथील पवन किराणा दुकानासमोरून दि. ०६.०६.२०१४ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३९,००० रुपये किमतीच्या ३ गोडे तेलाच्या टाक्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात ३७९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच पोलीस ठाणे-अजिंठा हद्दीतील उंडणगाव येथील व्यापारी घनश्याम रमेशराव दुसाद यांचे श्रीराम दुकानासमोरून दि. १३.०६.१४ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३९,९०० रुपये किमतीच्या ४ गोडे तेलाच्या टाक्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी पोलीस ठाणे अजिंठा येथे ३७९ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील, फौजदार पी.डी. भारती, पोहेकॉ किसन श्रीखंडे, विठ्ठल चव्हाण, मोईस बेग, संदीप वानखेडे यांनी कामगिरी केली.
२०१४ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्वी बिडकीन, वडोदबाजार, शिऊर, फुलंब्री हद्दीतील गोडे तेलाच्या टाक्या चोरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळून गोडे तेलाच्या टाक्या जप्त केल्या होत्या.