रस्ता एक, योजना अनेक!
By Admin | Updated: July 22, 2014 00:14 IST2014-07-22T00:11:04+5:302014-07-22T00:14:43+5:30
बीड : एकाच रस्त्यावर वेगवेगळ्या योजनांखाली लाखोंची उधळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात घडला आहे़ यासंदर्भात चौकशी करुन कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे़

रस्ता एक, योजना अनेक!
बीड : एकाच रस्त्यावर वेगवेगळ्या योजनांखाली लाखोंची उधळपट्टी केल्याचा धक्कादायक प्रकार आष्टी तालुक्यात घडला आहे़ यासंदर्भात चौकशी करुन कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे़
रस्ते कामांसाठी शासनाच्या भरमसाठ योजना आहेत़ मग्रारोहयो, सार्वजनिक बांधकाम, खासदार फंड, तेरावा वित्त आयोग, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन विकास निधी, झेडपीआरचा त्यात समावेश आहे़ यापैकी काही योजनांचा पैसा एक ते दोन वर्षांत एकाच रस्त्यावर खर्ची झाल्याचा आरोप भाजयुमोचे आष्टी तालुकाध्यक्ष रामभाऊ खाडे यांनी केला आहे़ आष्टी ग्रामीण रुग्णालय जोडरस्ता, आष्टी ते पिंप्री, पारगाव ते बळेवाडी, कऱ्हेवडगाव ते कऱ्हेवाडी, कडा ते बीड, टाकळसिंग ते सांगवी, आष्टा हरिनारायण ते आष्टी, कडा ते रुई नालकोल, पांढरी ते हंबर्डे वस्ती आदी रस्ते कामांवर विविध योजनांखाली लाखोंचा निधी उचलण्यात आला आहे़
एकाच रस्त्यावर वर्ष, किंवा दोन वर्षात लाखोंचा निधी कसा काय खर्च होतो असा सवाल खाडे यांनी उपस्थित केला आहे़ रस्ते कामांमध्ये अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे़
माहिती अधिकाराला केराची टोपली
रामभाऊ खाडे यांनी रस्ते कामांच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे ६ मे २०१४ रोजी महिती मागविली; पण त्यांना काही माहिती मिळालीच नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकउे तक्रार केली. त्यानंतर बांधकाम विभाग क्ऱ १ चे कार्यकारी अभियंता एस. आर. शेंडे यांनी लेखी पत्र देऊन माहिती अधिकाराचा अर्जच मिळाला नाही, अशी सारवासारव केली. (प्रतिनिधी)
न्यायालयात जाणार
माहिती अधिकाराचा अर्ज करुनही माहिती दडविली जात आहे. रस्ते कामात सारे अलबेल आहे तर माहिती देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? असा सवाल रामभाऊ खाडे यांनी केला आहे. अनियमिततेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.