दरोडेखोरांचा धुमाकूळ !
By Admin | Updated: April 17, 2015 00:39 IST2015-04-17T00:37:34+5:302015-04-17T00:39:58+5:30
भूम : तालुक्यातील वालवड येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला़

दरोडेखोरांचा धुमाकूळ !
भूम : तालुक्यातील वालवड येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला़ येथील दोन घरांसह तीन पानटपऱ्या फोडून जवळपास साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे़ तर एका इसमावर शस्त्राने वार करून जखमीही करण्यात आले आहे़ या प्रकारामुळे वालवडसह परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी सांगितले की, वालवड येथील बाळू रंगनाथ खोसे यांचे जिल्हा परिषद शाळेच्याजवळ घर आहे़ नेहमीप्रमाणे खोसे हे बुधवारी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या स्वयंपाक खोलीचा दरवाजाचा कडीकोंडा काढून ७ दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला़ खोसे यांना शस्त्राचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने, कपाटातील रोख १ लाख, १७ हजार रुपये असा ५ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला़ या घटनेवेळी त्यांचा मुलगा शाम खोसे हा जागा झाल्यानंतर दरोडेखोरांनी त्याच्या हातावर शस्त्राने जोरात वार केला़ त्यानंतर चोरट्यांनी बाळासाहेब देवळकर यांच्या घरात घुसून ३५०० रुपये लंपास केले़ तर दिपक टिपे, सागर पाटील यांच्या पानटपऱ्या फोडल्या़ तसेच आबासाहेब मस्के यांच्या पानटपरीतून जवळपास ४००० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अप्पर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, पोलीस उपाधीक्षक डॉ़ प्रिती टिपरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली़ याप्रकरणी बाळू खोसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोनि रणजित सावंत हे करीत आहेत़ दरोडेखोरांच्या शोधार्थ विविध पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)