मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांचा बाजार; ‘एसटी’सह प्रवासी, वाहन चालक बेजार
By संतोष हिरेमठ | Updated: December 5, 2024 12:39 IST2024-12-05T12:37:43+5:302024-12-05T12:39:44+5:30
ग्राऊंड रिपोर्ट: ‘एसटी’सह रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा, प्रवासी जेरीस

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांचा बाजार; ‘एसटी’सह प्रवासी, वाहन चालक बेजार
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर हातगाड्या, टपऱ्या लागतात, एखादा बाजार भरतो, अगदी तशीच काहीशी अवस्था मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षांची झाली आहे. रस्त्यावर अक्षरश: रिक्षांचा बाजार भरतो आहे. बसस्थानकातून प्रवासी बाहेर पडताच ‘हर्सूल आहे का, सिडको आहे का, कुठे जायचे...’ असे म्हणत रिक्षा चालक प्रवाशांच्या मागे हात धुऊन लागतात. त्यामुळे प्रवासी बेजार होत आहेत. तर रिक्षांच्या अडथळ्यामुळे रस्त्यावरील अन्य वाहन चालक, पादचारीही हैराण होत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीत ये-जा करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत आणि एसटी आत येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी असे दोन प्रवेशद्वार आहेत. या चारही गेटला रिक्षा चालकांचा दररोज विळखाच असतो. प्रवाशांना नेण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांना कुठे थांबण्यासाठी जागाच नाही. परिणामी, पार्किंगमध्ये अथवा भररस्त्यावरच वाहन उभे करावे लागते. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. मात्र, रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला कोणीही आवर घालताना दिसत नाही.
शहर बसथांब्यावरही रिक्षाच
मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराला लागूनच रिक्षा थांबा आहे. अनेक रिक्षा चालक प्रामाणिकपणे रांगेत रिक्षा उभ्या करतात. परंतु रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांची संख्या कितीतरी अधिक आहे. प्रवासी नेण्यावरून थांब्यावरील आणि रस्त्यावर उभे राहणाऱ्या रिक्षा चालकांमध्ये वादही होतात. येथील शहर बसथांब्यावरही रिक्षांच थांबतात.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षाच रिक्षा
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षाच रिक्षा दिसतात. दुभाजक ओलांडून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी आपल्याच रिक्षात बसावे, यासाठी रिक्षा चालक रस्त्याच्या मधोमध जाऊन ‘कुठे जायचे?’ अशी विचारणा करताना पाहायला मिळाले.
चौकी रिकामीच
मध्यवर्ती बसस्थानकासमोर चौकी आहे. मात्र, या चौकीत कधीतरी वाहतूक पोलिस कर्मचारी दिसतात, असे रिक्षा चालकांनीच सांगितले. ‘लोकमत’ने बुधवारी दुपारी पाहणी केली, तेव्हाही चौकीत कोणी नव्हते.
एसटी आत, बाहेर नेण्याची कसरत
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आत आणि बाहेर पडणाऱ्या मार्गावरच रिक्षा उभ्या राहतात. त्यामुळे एसटी चालकांना बस आतमध्ये नेताना आणि बसस्थानकातून बाहेर पडताना मोठी कसरत करावी लागते.