चौकशी समितीच्या अहवालाची समिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 00:53 IST2015-07-20T00:34:12+5:302015-07-20T00:53:43+5:30
लातूर : रेणापूर तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन

चौकशी समितीच्या अहवालाची समिक्षा!
लातूर : रेणापूर तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ठपका होता़ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती़ दरम्यान, यात काही अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करीत जि़ प़ सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गदारोळ केला होता़ त्यामुळे पुन्हा तीन सदस्यीय समिती चौकशीसाठी नियुक्त केली होती़ या चौकशी समितीचा अहवाल सीईओंकडे प्राप्त झाला असून, त्यावर समिक्षा चालू आहे़ या अहवालात नेमके दडले काय हे गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत समोर येणार आहे़
लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत रेणापूर पंचायत समितीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामपंचायतीमार्फत नाला बल्डींग, नाला सरळीकरण, वृक्षारोपण, रोपवाटीका तसेच जलसंधारणाची कामे केली होती़ या कामात अनियमितता झाल्याचे जुन्या चौकशी समितीने ठपका ठेवला होता़ तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांकडून या कामातील १ कोटी २२ लाख ४४ हजार रुपयाची वसुली करावी, असे आदेश दिले होते़ या आदेशाचे पत्र मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून दडविले होते, असा ठपका ३ महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता़ जिल्हा परिषद सदस्य यावर आक्रमक झाल्याने पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्षांनी ३ सदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली़ या चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे़ दरम्यान, या अहवालाची जि़प़ प्रशासनाकडून समिक्षा करण्यात येत आहे़ पंचायत विभागाकडून समिक्षा झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाकडे या अहवालावर अभिप्राय मागविला जाणार आहे़ २३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपर्यंत या दोन्ही विभागाकडून या अहवालावर समिक्षा होणार आहे़
सर्वसाधारण सभेत वादंग उठल्यानंतर २७ जून रोजी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती़ या समितीला ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र ७ दिवसात अहवाल प्राप्त होऊ शकला नाही़ तब्बल १५ ते २० दिवसानंतर अहवाल सादर झाला आहे़ या अहवालात नेमके काय आहे, याकडे लक्ष लागले आहे़ २३ जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊनच संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांच्याकडे दाखल झालेला अहवाल पंचायत विभागाकडे पाठविण्यात आला असून, त्याची समिक्षा सुरु आहे़ कार्यवाहीतून कोणी सुटले आहे का, या प्रकरणाला विलंब का झाला, झाला असेल तर तो का झाला, याची समिक्षा पंचायत विभागही करीत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी दिली़
४तीन सदस्यीय समितीच्या चौकशी अहवालावर पंचायत विभागाकडून समिक्षा झाल्यानंतर पुन्हा तो सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला जाणार आहे़ त्यानंतर संबंधितांना नोटिसा पाठवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले जाणार आहे़ त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले़
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत कृषी विकास अधिकारी मोहन भिसे, रोजगार हमी योजनेचे गटविकास अधिकारी शिवराज केंद्रे यांचा समावेश आहे़ या समितीने पुन्हा रेणापूर तालुक्यात झालेल्या ‘त्या’ कामाच्या अनुशंगाने चौकशी केली आहे़ विभागीय चौकशीत तीन अधिकारी प्रस्तावित होते़ यात कुणी राहिले आहे का, कारवाईला का विलंब झाला, ते पत्र कुणी दडविले होते़ या अनुशंगाने अहवाल असण्याची शक्यता आहे़ मात्र हा अहवाल २३ जुलै रोजी होणाऱ्या सभेतच सदनापुढे येणार आहे़
तीन सदस्यीय समितीच्या अहवालाची पंचायत, सामान्य प्रशासनाकडून समिक्षा झाल्यानंतर सर्वसाधारण सभेतही त्यावर चर्चा होणार आहे़ या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, म्हणून ही प्रक्रिया करण्यात आली असल्याचे जि़प़ सूत्रांकडून सांगण्यात आले़