महसुली वादाला ‘व्हॉटस् अॅप’ची फोडणी
By Admin | Updated: April 13, 2015 00:48 IST2015-04-13T00:40:38+5:302015-04-13T00:48:44+5:30
पंकज जैस्वाल , लातूर महसुली अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि तलाठी संघटनांची एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू असून, त्यांच्या वादाला ‘व्हॉटस् अॅप’ या सोशल मीडियाची फोडणी

महसुली वादाला ‘व्हॉटस् अॅप’ची फोडणी
पंकज जैस्वाल , लातूर
महसुली अधिकाऱ्यांसह कर्मचारी आणि तलाठी संघटनांची एकमेकांवर आरोपांची चिखलफेक सुरू असून, त्यांच्या वादाला ‘व्हॉटस् अॅप’ या सोशल मीडियाची फोडणी मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबतचा अहवाल गुलदस्त्यात असला, तरी गटबाजी उफाळल्याने मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी संवर्गातील बदल्या एप्रिलमध्येच होणार असल्याचे चित्र आहे.
महसुली वसुली आणि मार्च एण्डचे टार्गेट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने केवळ मंडळ अधिकारी व तलाठ्यांना निलंबित करण्यात आल्याच्या कारणावरून तलाठी संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार, नायब तहसीलदारांवर निवेदनाद्वारे गंभीर आरोप केले. २८ मार्च रोजी लातूर जिल्हा तलाठी संघाच्या आमसभेत विविध ठरावही पारित झाले. मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून बेमुदत संपाचे हत्यारही त्यांनी उपसले होते.
त्यापूर्वीच ६ एप्रिल रोजी अहमदपूर तालुक्यातील एका तलाठ्याने लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेला संदेश व्हॉटस् अॅप या सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे ८ एप्रिल रोजी निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी गंभीर दखल घेत संबंधित तलाठ्यास १० एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांवरील आरोपांबाबत म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे फर्माविले. याबाबतचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले काय भूमिका घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.