पाणी उपसाप्रकरणी महसूलने केली कारवाई
By Admin | Updated: December 25, 2016 00:07 IST2016-12-24T22:02:41+5:302016-12-25T00:07:18+5:30
जाफराबाद : शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे.

पाणी उपसाप्रकरणी महसूलने केली कारवाई
जाफराबाद : शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे. तहसीलच्या पथकाने बुधवारी वरूड बुद्रुक येथील तलाव क्र मांक एक मध्ये पाणी उपसा करीत असलेले पाच विद्युत पंप, दोन इंजिन व इतर साहित्य जप्त केले.
महसूल विभागाची परवानगी न घेता विविध प्रकल्पातून शेतकरी मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा करत होते. याबाबत अनेक तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी महसूल विभागाने धडक कारवाई करत शेतकऱ्यांचे वीजपंप, इंजिन आणि केबल व इतर साहित्य जप्त केले. पाणी उपसा परवाना नसताना विना परवानगी पाणी उपसा करताना काही शेतकरी आढळून आल्याने नायब तहसीलदार बी. के. चंडोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागला. त्यातच जाफराबाद तालुक्यात अनेक गावात पाणीटंचाई होती. यंदा चांगला पाऊस झाल्याने परिसरातील प्रकल्पात चांगले पाणी आहे. शेतकऱ्यांच्या विहिरींना सुध्दा चांगले पाणी आहे. शेतकरी प्रकल्पाच्या पाण्याची चोरी करत असल्याने प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महसूल विभागाने आत्तापासूनच उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही धडक मोहीम राबविण्यात आली आहे. अवैध पाणी उपसा करू नये, असे नायब तहसीलदार चंडोळ यांनी आवाहन केले आहे. या कारवाईत महसूल पथक लघु पाटबंधारे विभाग, वीज वितरण कंपनीमधील अधिकारी यांना सोबत घेऊन पाणी चोरी करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. या पथकामध्ये नायब तहसीलदार बी. के. चंडोळ, कनिष्ठ अभियंता व्ही. के. खंबाट, मंडळ अधिकारी एस. डी. भदरगे, एस. बी. काळे, महावितरणचे सुभाष कुलकर्णी यांचा समावेश आहे. (वार्ताहर)