महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:40 IST2021-11-29T18:07:01+5:302021-11-29T18:40:54+5:30
शेती नसणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर अतिवृष्टीची ८२५ रुपये नुकसान भरपाई जमा झाली आहे.

महसूल विभागाची कमाल, शेतीच नाही अन आले अतिवृष्टीचे अनुदान
सिल्लोड ( औरंगाबाद ) : ज्यांना शेती आहे ज्यांचे अतिवृष्टी मुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, एका भूमीहीन व्यक्तीस अतिवृष्टीची 825 रुपये नुकसान भरपाई मिळाल्याचा प्रकार अजिंठा येथे उघडकीस आला (no agricultural land but got excess rainfall subsidy) . त्या भूमिहीन व्यक्तीने मिळालेली रक्कम शासन खात्यावर जमा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अजिंठा येथील मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांच्या कडे शेती नाही फक्त त्यांच्याकडे एक राहते घर आहे. त्यांना जमीन नाही इतकेच नव्हे तर त्यांच्या परिवारात वडिलोपार्जित कोणतीही जमीन सुद्धा नाही. तरी ही अजिंठा येथील एसबीआय शाखेतील त्यांच्या खात्यात 26 नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचे 825 रुपये नुकसान भरपाई जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आहे. बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे यांच्याकडे तक्रार केली आहे. जमा झालेले अनुदान सरकारी खात्यावर जमा करून करावे, तसेच भूमिहीन असताना अनुदान कसे मिळाले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कठोर कारवाई केली जाईल
चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस यांनी प्रशासनाची चूक लक्षात आणून दिली.
- उपविभागीय अधिकारी संजीव मोरे सिल्लोड.
मला अनुदान मिळाले कसे..
भूमिहीन असताना नुकसान भरपाई मिळाली याचे आश्चर्य वाटत आहे. लक्षात आले नसते तर कदाचित माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असता. आता कुणावर गुन्हे दाखल होतात याकडे माझे लक्ष आहे.
-मोहम्मद अब्दुल मशहूद मुगीस चाऊस, अजिंठा