वीज ग्राहकाला सव्वालाख परत द्या, औरंगाबाद ग्राहक मंचाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 15:20 IST2018-03-15T15:20:17+5:302018-03-15T15:20:56+5:30
महावितरणने चुकीच्या वीज बिलापोटी तक्रारदार ग्राहकाकडून वसूल केलेले अतिरिक्त एक लाख ३५ हजार ३३० रुपये धनादेशाद्वारे व्याजासह त्यांना परत करण्याचा आदेश महावितरणच्या वीज ग्राहक गा-हाणे निवारण मंचने दिला.

वीज ग्राहकाला सव्वालाख परत द्या, औरंगाबाद ग्राहक मंचाचा आदेश
औरंगाबाद : महावितरणने चुकीच्या वीज बिलापोटी तक्रारदार ग्राहकाकडून वसूल केलेले अतिरिक्त एक लाख ३५ हजार ३३० रुपये धनादेशाद्वारे व्याजासह त्यांना परत करण्याचा आदेश महावितरणच्या वीज ग्राहक गा-हाणे निवारण मंचच्या अध्यक्षा शोभा वर्मा, सचिव काकडे आणि सदस्य विलास काबरा यांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे वीज ग्राहकाच्या मीटरची योग्य नोंद न घेता ग्राहकास चुकीचे बिल आकारून, कायदेशीर नोटीस न देता त्याचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल ५००० रुपये नुकसानभरपाई आणि ग्राहकाने ‘सोलार नेट’ मीटर आणले असल्यामुळे त्याची किंमतदेखील परत देण्याचे आदेशात म्हटले आहे. या संदर्भात विश्वभारती कॉलनीतील डॉ. ज्योती दीपक गयाळ यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी ५ केडब्लू क्षमतेची सोलर यंत्रणा बसविली. यासाठी त्यांनी महावितरणच्या संबंधित विभागाची मान्यता घेऊन सोलारसाठी लागणारे नेट मीटर विकत आणले. चाचणी विभागाकडून तपासून घेतल्यानंतर ते बसविले. महावितरणतर्फे त्यांना मे १७ ते आॅगस्ट १७ या चार महिन्यांचे सरासरीवर आधारित २८२ युनिट वीज वापराचे बिल देण्यात आले. यात सोलारद्वारे निर्मित करण्यात आलेले युनिट दाखविण्यात आले नाहीत. सप्टेंबर १७ मध्ये त्यांना एक लाख ६१ हजार ५३० रुपये बिल देण्यात आले.
बिल भरले नाही म्हणून त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. महावितरणच्या या कृतीविरुद्ध त्यांनी ग्राहक प्रतिनिधी हेमंत कापडिया यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. सुनावणीत त्यांनी ग्राहकाने भरलेली रक्कम बिलात वळती न करता धनादेशाद्वारे परत करण्याचीही विनंती केली. सुनावणीअंती मंचाने वरीलप्रमाणे आदेश दिला.