किरकोळ वाद; कन्हैय्यानगरात तणाव
By Admin | Updated: May 3, 2015 00:58 IST2015-05-03T00:46:45+5:302015-05-03T00:58:17+5:30
जालना : येथील कन्हैय्यानगर भागात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीमुळे दंगलसदृष्य स्थिती निर्माण झाली

किरकोळ वाद; कन्हैय्यानगरात तणाव
जालना : येथील कन्हैय्यानगर भागात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीमुळे दंगलसदृष्य स्थिती निर्माण झाली. मात्र चंदनझिरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटातील एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे.
या भागात शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मोटारसायकलवर बसताना एका इसमाच्या पायाचा धक्का दुसऱ्या इसमास लागल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला. दोन भिन्न समाजाचे लोक समोरासमोर आले. त्यांच्यात शिवीगाळ होऊन मारामारी झाली व दगडफेकही करण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला. या प्रकाराची माहिती कळताच पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्यासह चंदनझिरा ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आरसीपीची एक प्लाटूनही तेथे दाखल झाली.
पोलिसांनी तातडीने दोन्ही गटातील १० जणांना अटक केली. यात योगेश रमेश भगत, भागुलाल कचरूलाल भगत, अनिल सुंदरलाल जांगडे, दिलीप भागीरथ जांगडे, साई कुंडलिक पाचरणे, सय्यद ईलियास सय्यद लियाकत, शेख नफीस शेख हबीब, सय्यद वसीम सय्यद सिकंदर, शेख आसीफ शेख गफूर, जुबेरखान सलीम खान (रा. सर्व कन्हैय्यानगर) यांचा समावेश आहे. या घटनेबाबत अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनीही घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील नागरिकांशी चर्चा केली व शांतता राखण्याचे आवाहन केले. जो कोणी असे कृत्य करेल त्याच्याविरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी दिला.