अभियांत्रिकीचा निकाल लागेल ३० दिवसांत
By Admin | Updated: December 30, 2014 01:18 IST2014-12-30T00:48:07+5:302014-12-30T01:18:43+5:30
औरंगाबाद : तुमचे चांगले सहकार्य मिळाल्यास अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांचा निकाल अवघ्या ३० दिवसांतच जाहीर करू, असा विश्वास परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांनी प्राचार्यांना दिला.

अभियांत्रिकीचा निकाल लागेल ३० दिवसांत
औरंगाबाद : तुमचे चांगले सहकार्य मिळाल्यास अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमांचा निकाल अवघ्या ३० दिवसांतच जाहीर करू, असा विश्वास परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड यांनी प्राचार्यांना दिला.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी काही प्राध्यापकांनी असहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे चार जिल्ह्यांतील काही उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्रांवर अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीअभावी पडून होत्या. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली २२ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बीड येथील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालय व अन्य दोन-तीन महाविद्यालये वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांतील सर्व अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक असते; पण अनेक महाविद्यालयांतील पात्र प्राध्यापक हे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी निमंत्रित केल्यानंतरही तिकडे दुर्लक्ष करत असतात. त्यामुळे अभियांत्रिकीच्या मागील परीक्षेचा निकाल तब्बल ६० दिवसांनंतर जाहीर करण्यात आला होता. यंदा विद्यापीठाने पहिल्यांदाच अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधि अभ्यासक्रमांच्या परीक्षेत प्रायोगिक तत्त्वावर ‘बारकोडिंग’च्या उत्तरपत्रिकांचा अवलंब केला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीमध्ये काही चुका राहू नयेत. काही प्राध्यापकांना या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये अडचणी येऊ नयेत, म्हणून आज याबद्दल प्राचार्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
१ डिसेंबरपासून अभियांत्रिकी व फार्मसीच्या परीक्षा सुरू झाल्या असून,६ जानेवारीला त्या संपतील. संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपले शैक्षणिक सत्र १२ जानेवारीपासून सुरू करण्याऐवजी ते २० जानेवारीनंतर सुरू करावे. ज्यामुळे प्राध्यापकांना अध्यापन कार्यात व्यस्त न राहता ते उत्तरपत्रिका तपासणीसाठी वेळ देऊ शकतील. विद्यापीठ कार्यक्षेत्रात ३ उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, सर्व केंद्रे औरंगाबादेतच आहेत. या केंद्रांवर प्राध्यापकांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी पाठवावे, असे आवाहन कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी सर्व प्राचार्यांना केले. ४
या वर्षी विद्यापीठाने उत्तरपत्रिका मूल्यांकन केंद्र हे अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमानुसार स्थापन केले आहेत. विद्यापीठातील केंद्रामध्ये प्रथम, तृतीय व चतुर्थ वर्षाच्या उत्तरपत्रिका तपासल्या जातील. छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्रामध्ये केवळ द्वितीय वर्षाच्या तर एमआयटीमध्ये बी. टेक. व एम. टेक. या दोन अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. ४
अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी (रिड्रेसल) काही महाविद्यालयांतील प्राध्यापक हे विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता यापुढे संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना रिड्रेसलचा प्रस्ताव खास दूतामार्फतच विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक राहील.