परळीचे औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत

By Admin | Updated: September 2, 2014 01:53 IST2014-09-02T00:15:04+5:302014-09-02T01:53:10+5:30

परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या खडका (ता़ सोनपेठ) बंधारा रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भरला़

Restoration of Parli thermal power station | परळीचे औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत

परळीचे औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत


परळी : येथील औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी पुरवठा केल्या जाणाऱ्या खडका (ता़ सोनपेठ) बंधारा रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भरला़ त्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्राचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़ पहिल्या टप्प्यात तीन संच सुरू होणार असून उर्वरित संचही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत़
सोमवारी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ५, ६, ७ हे तीन संच सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली़ मंगळवारी या संचातून वीज निर्मितीस प्रारंभ होणार आहे़ खडका धरणात पाणीसाठा नसल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राचे सर्वच्या सर्व संच म्हणजे पाच संच बंद होते़ त्यामुळे ११३० मेगावॅट वीज निर्मिती गेल्या काही दिवसापासून ठप्प होती़ आता खडका धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे मंगळवारपासून वीज निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे़
परळी औष्णिक विद्युत केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक ३, ४, ५ हे तीन संच तर २५० मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक ६ व ७ हे दोन संच आहेत़ या पाच संचाची स्थापित क्षमता ११३० मेगावॅट इतकी आहे़ खडका धरणात पाण्याचा खडखडाट झाल्याने वीज निर्मिती ठप्प होती़ आता यातील तीन संच कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़
पाणी संकट दूर
रविवारी खडका धरणात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले़ आठ दिवसांपासून पाऊस मुक्कामी असल्यामुळे खडका धरणात पाणीपातळी वाढली आहे़ रात्री ९ वाजता हे धरण पाण्याने भरले व ओव्हरफ्लो झाले़ त्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्रासमोरील पाण्याचे संकट दूर झाले आहे़ (वार्ताहर)
औष्णिक विद्युत केंद्रातील अधीक्षक अभियंता मनोहर खांडेकर म्हणाले की, खडका बंधाऱ्यात रविवारी पाणी आले आणि सोमवारी सकाळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ७ सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे़
४२१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ५ हा सोमवारी दुपारी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू केली़ प्रत्येक संचातून वीज निर्मिती होईल़

Web Title: Restoration of Parli thermal power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.